कुमठे बौद्ध वाडीत अखेर कमी दाबाच्या वीज समस्येला पूर्णविराम; नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित, बीएसएनएल टॉवरमुळे मोबाईल रेंजही सुरू
कुमठे बौद्ध वाडीत अखेर कमी दाबाच्या वीज समस्येला पूर्णविराम; नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित, बीएसएनएल टॉवरमुळे मोबाईल रेंजही सुरू
कुमठे प्रतिनिधी :
कुमठे ग्रामपंचायत हद्दीतील बौद्ध वाडीत गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कमी दाबाच्या वीजपुरवठ्याच्या समस्येला अखेर दिलासा मिळाला असून स्वतंत्र नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित करण्यात आला आहे. दीर्घकाळ वीज पुरवठा व्होल्टेजविना कमी दाबाने होत असल्याने बौद्ध वाडीत होणाऱ्या सार्वजनिक कार्यक्रमांसह दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होत होता. ही गंभीर बाब लक्षात घेत सरपंच सौ. स्वाती संतोष जाधव यांनी मागील जून महिन्यात महावितरण महाबळेश्वर विभागाला पत्र देत स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर देण्याची मागणी केली होती.
या मागणीची दखल घेत महावितरणचे अभियंता गुरव यांनी तात्काळ पाठपुरावा केला. सरपंच स्वाती जाधव यांनी वेळोवेळी केलेल्या विचारणा व प्रयत्नांमुळे सुमारे पंधरा दिवसांपूर्वी ट्रान्सफॉर्मर बसवण्याचे काम पूर्ण झाले. आज सरपंच स्वाती जाधव यांच्या हस्ते या नवीन ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन करण्यात आले असून बौद्ध वाडीत आता नव्या ट्रान्सफॉर्मरवरून वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यावेळी कुमठे गावचे ग्रामस्थ सुभाष जाधव यांनी श्रीफळ फोडून पूजन केले. कार्यक्रमास संपत जाधव, गेनू जाधव, गौतम जाधव, रमाई महिला मंडळाच्या अध्यक्ष सुशीला जाधव, लता जाधव, दिलीप जाधव, संतोष जाधव यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र जागेअभावी ट्रान्सफॉर्मर वाडीपासून काहीसा लांब बसवावा लागल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, कुमठे ग्रामपंचायतीसाठी आणखी एक महत्त्वाची सुविधा आजपासून कार्यान्वित झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेले बीएसएनएल टॉवरचे काम अखेर पूर्ण होऊन आजपासून टॉवर सुरू करण्यात आला. यामुळे कुमठे गावात बी, एस, एन, एल मोबाईल सेवा आणि रेंज उपलब्ध झाली आहे. यावेळी सरपंच सौ. स्वाती संतोष जाधव यांनी टॉवरच्या मेन पॅनलची पूजा केली, तर उपसरपंच सीताराम राणे यांनी श्रीफळ वाढवून पूजन केले. ग्रामस्थ सुभाष जाधव, गौतम जाधव, अरविंद जाधव, संतोष जाधव, गणेश जाधव, रोहित जाधव उपस्थित होते. बीएसएनएलचे टेक्निकल कर्मचारी दीपक जाधव व त्यांचे सहकारीही यावेळी उपस्थित होते. शेवटी सरपंच स्वाती जाधव यांनी मेन पॅनलचे बटण दाबून अधिकृतपणे गावात मोबाईल रेंज सुरू केली.
नवीन ट्रान्सफॉर्मरमुळे वीजपुरवठा सुरळीत होणार असून बीएसएनएल टॉवर सुरू झाल्याने दळणवळण व संपर्काच्या दृष्टीने कुमठे गावासाठी हा दिवस ऐतिहासिक ठरल्याची भावना ग्रामस्थांतून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment