जावलीतील सावरी गावात एमडी ड्रग्स निर्मितीचा पर्दाफाश; मुंबई क्राईम ब्रँचचा मोठा छापा, चौघे ताब्यात, २०–२५ कोटींच्या मुद्देमालाचा संशय
जावलीतील सावरी गावात एमडी ड्रग्स निर्मितीचा पर्दाफाश; मुंबई क्राईम ब्रँचचा मोठा छापा, चौघे ताब्यात, २०–२५ कोटींच्या मुद्देमालाचा संशय
बामणोली | प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील सावरी गावात मुंबई क्राईम ब्रँचने टाकलेल्या मोठ्या छाप्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. म्हावशी सावरी गावात एका शेडमध्ये एमडी ड्रग्स तयार होत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर नियोजनबद्ध कारवाई करत हा छापा टाकण्यात आला. या कारवाईत तीन कारागीर आणि एक स्थानिक व्यक्ती अशा एकूण चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मुंबई पोलिसांनी यापूर्वी मुंबईत एका तरुणाला अटक केली होती. चौकशीत या तरुणाने एमडी ड्रग्सचा मोठा साठा आणि त्याची हालचाल सातारा जिल्ह्यातील बामणोली परिसरातील सावरी गावात असल्याची माहिती दिली. या धाग्याच्या आधारे मुंबई क्राईम ब्रँचने सातारा पोलिसांशी समन्वय साधत संयुक्त कारवाईचे नियोजन केले आणि पथक बामणोली येथे दाखल झाले.
बामणोली आश्रम शाळेपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या म्हावशी सावरी गावातील संबंधित शेडवर छापा टाकण्यात आला. दुर्गम व जंगलालगतचा भाग असल्याने पोलिसांनी अत्यंत खबरदारी घेत कारवाई केली. प्राथमिक तपासात या ठिकाणी एमडी ड्रग्सची निर्मिती सुरू असल्याचे संकेत मिळाले असून मोठ्या प्रमाणावर कच्चा माल, उपकरणे आणि साठा असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणातील मुद्देमालाची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २० ते २५ कोटी रुपयांपर्यंत असू शकते, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवला जात आहे.
घटनास्थळी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून संपूर्ण परिसराची कसून झडती सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या चौघांची सखोल चौकशी करण्यात येत असून या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास सुरू आहे. या छाप्यातून ड्रग्स तस्करीचे मोठे जाळे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. छापेमारी पूर्ण झाल्यानंतर आणि तपासातील पुढील निष्कर्षांनंतर पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
This comment has been removed by the author.
ReplyDelete