नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरमध्ये भव्य रूट मार्च व दंगल नियंत्रण सराव

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाबळेश्वरमध्ये भव्य रूट मार्च व दंगल नियंत्रण सराव

महाबळेश्वर प्रतिनिधी –

 आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आज महाबळेश्वर पोलीस ठाण्याच्या वतीने भव्य रूट मार्च काढण्यात आला. त्याचबरोबर संभाव्य आपत्कालीन परिस्थिती, विशेषतः जातीय दंगलीसारख्या प्रसंगांवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस परेड ग्राउंडवर दंगल नियंत्रण सराव अर्थात ‘मॉप ड्रिल’चे आयोजन करण्यात आले होते.

पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेला रूट मार्च पोलीस परेड ग्राउंडपासून सुरू होऊन स्कूल मोहल्ला, गवळी आळी, कोळी आळी, मरीपेठ, सुभाष चौक, एसटी स्टँड, इराणी पेट्रोल पंप, मज्जिद रोड मार्गे शिवाजी चौक येथे पोहोचला. या संपूर्ण मार्गावर पोलिसांनी शिस्तबद्ध संचलन करत नागरिकांना सुरक्षिततेचा ठाम संदेश दिला. रूट मार्चदरम्यान शहरातील नागरिकांनीही या कारवाईकडे सकारात्मक दृष्टीने पाहत पोलिसांच्या उपस्थितीमुळे सुरक्षिततेची भावना व्यक्त केली.

रूट मार्चच्या समारोपानंतर पोलीस परेड ग्राउंडवर विशेष मॉप ड्रिलचे आयोजन करण्यात आले. या सरावात जातीय तणाव किंवा दंगलीसारखी परिस्थिती निर्माण झाल्यास जमावाला कशा पद्धतीने पांगवायचे, कायदा व सुव्यवस्था कशी राखायची आणि परिस्थितीवर तात्काळ नियंत्रण कसे मिळवायचे, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या सरावामुळे पोलीस दलाची सज्जता, समन्वय आणि कार्यक्षमता अधिक मजबूत झाल्याचे चित्र दिसून आले.

या संपूर्ण रूट मार्च व मॉप ड्रिलचे नेतृत्व वाई उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) सुनील साळुंखे यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक, दोन पोलीस उपनिरीक्षक, आरसीपी प्लॅटून, सुमारे ४० पोलीस कर्मचारी आणि ५० होमगार्ड या मोहिमेत सहभागी झाले होते.

निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, शहरात शांतता टिकून राहावी आणि नागरिक निर्भयपणे मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावेत, यासाठी महाबळेश्वर पोलीस पूर्णतः सज्ज असल्याचे या रूट मार्च व दंगल नियंत्रण सरावातून स्पष्ट करण्यात आले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl