तापोळा येथे एकाच घटनेत दोन मजुरांचे संशयास्पद मृत्यू; उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली
तापोळा येथे एकाच घटनेत दोन मजुरांचे संशयास्पद मृत्यू; उपचारापूर्वीच प्राणज्योत मालवली
तापोळा प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा परिसरात कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या दोन मजुरांचा एकाच घटनेत संशयास्पद मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली असून या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बी.एन.एस.एस.) २०२३ चे कलम १९४ अन्वये अ. म. रजि. नं. ४०/२०२५ व ४१/२०२५ अशा दोन स्वतंत्र नोंदी करण्यात आल्या आहेत.
या घटनेतील मयतांची नावे विपिन तिवारी (वय ५५, रा. टोला वॉर्ड नं. ७, बरोली, गोपालगंज, बिहार) आणि मतीउर रहमान (वय ५३, रा. सिसवा, पो. बडहेरिया, जि. शिवान, बिहार) अशी असून दोघेही तापोळा परिसरात ठेकेदारी कामासाठी वास्तव्यास होते.
दिनांक ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास दोघेही तापोळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांनाही उपचारापूर्वीच मयत घोषित केले. विपिन तिवारी यांचा मृत्यू सायंकाळी ३.५४ वाजता, तर मतीउर रहमान यांचा मृत्यू सायंकाळी ३.४६ वाजता अधिकृतरीत्या नोंदविण्यात आला आहे.
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दोघेही कंटेनरमध्ये असलेल्या दोन खोल्यांपैकी एका खोलीत झोपलेले होते. त्या खोलीत कोळसा ठेवलेला घमेला पायाजवळ ठेवून ते झोपले असताना दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. त्यानंतर त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र तापोळा येथे हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण तत्काळ स्पष्ट होऊ शकले नसल्याचे नमूद केले आहे.
या घटनेची खबर तापोळा येथील ठेकेदार सचिन सुभाष कदम (वय ३८) यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी तात्काळ दखल घेत घटनास्थळी पाहणी करून दोन्ही मृतदेहांवर इन्क्वेस्ट पंचनामा केला असून शवविच्छेदन (पी.एम.) प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. घटनास्थळ हे महाबळेश्वर पोलीस ठाण्यापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर दक्षिण दिशेला आहे.
पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार कांबळे (बॅज नं. ८१७) करीत आहेत. एकाच ठिकाणी, एकाच परिस्थितीत दोन मजुरांचा मृत्यू झाल्याने हा प्रकार संशयास्पद मानला जात असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून या घटनेचा सखोल आणि बारकाईने तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
Comments
Post a Comment