बिभवी (ता. जावळी) येथील मुख्य चौकात भीषण आग; चार घरे जळून खाक, सिलेंडर स्फोटामुळे थरार
बिभवी (ता. जावळी) येथील मुख्य चौकात भीषण आग; चार घरे जळून खाक, सिलेंडर स्फोटामुळे थरार
मेढा प्रतिनिधी –
बिभवी, ता. जावळी येथे सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास मुख्य चौक परिसरात अचानक लागलेल्या आगीत चार घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यावेळी घरातील सर्व सदस्य शेतातील कामानिमित्त बाहेर गेल्याने कोणतीही जीवितहानी किंवा जखमी होण्याची घटना घडली नाही. मात्र या भीषण आगीत कुटुंबीयांचे संसारोपयोगी साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले असून ऐन थंडीच्या दिवसांत चार कुटुंबांवर उघड्यावर येण्याची वेळ आली आहे.
बिभवी गावातील ग्रामपंचायत कार्यालय, हनुमान मंदिर व भैरोबा मंदिराजवळ असलेल्या विठ्ठल शंकर कदम, पांडुरंग शंकर कदम, वसंत शंकर कदम, दत्तात्रय सावळा कदम व प्रभाकर सावळा कदम यांच्या राहत्या घरांना ही आग लागली. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही सर्व घरे जुन्या पद्धतीची व लाकडी असल्याने काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. एकमेकांना लागून असलेली घरे आणि प्रत्येक घरात असलेले गॅस सिलेंडर यामुळे धोका अधिकच वाढला.
आगीदरम्यान दोन गॅस सिलेंडरचा मोठा स्फोट होऊन छपरावरील जळकी लाकडे परिसरात विखुरली गेली, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या अत्यंत धोकादायक परिस्थितीत सातारा पोलीस दलातील तुषार दादू शिंदे यांनी धाडस दाखवत तीन गॅस सिलेंडर बाहेर काढले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. मात्र उर्वरित दोन सिलेंडरचा आगीत जोरदार स्फोट झाला.
आग विझवण्यासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने अथक प्रयत्न केले. सरपंच संतोष बांदल, उपसरपंच कांताराम शिंदे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग वाघ, प्रवीण देशमुख, विक्रम जाधव, ज्ञानेश्वर जाधव यांच्यासह अनेक ग्रामस्थ आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नशील होते. मेढा येथील विलास पवार यांनी स्वतःचा पाण्याचा टँकर आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र आगीची तीव्रता मोठी असल्याने ते प्रयत्न अपुरे ठरले. अखेर सातारा नगरपरिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर दुपारी सुमारे बाराच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
या घटनेची माहिती मिळताच मेढा पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तसेच ग्राम महसूल अधिकारी श्री. नगरवाल यांनी पंचनामा केला. या आगीत घरातील अन्नधान्य, कपडे, भांडी, कागदपत्रे व इतर मौल्यवान साहित्य पूर्णतः नष्ट झाले असून संबंधित कुटुंबांना तातडीच्या मदतीची गरज निर्माण झाली आहे.
दरम्यान, हाकेच्या अंतरावर असलेल्या मेढा नगरपंचायतीकडे अद्याप मोठ्या क्षमतेचा अग्निशमन बंब उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तालुक्यात कुठेही आगीची घटना घडल्यास सातारा किंवा वाई येथून बंब मागवावा लागतो, त्यामुळे विलंब होऊन आगीची तीव्रता वाढते व नुकसान अधिक होते. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी मेढा नगरपंचायतीच्या स्तरावर तातडीने अग्निशमन बंब उपलब्ध करून देण्याची मागणी ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.
Comments
Post a Comment