भोसे गावची शान — इन्स्पायर अवॉर्डमध्ये श्रेयस गोळेची राष्ट्रीय पातळीवरील भव्य झेप
भोसे गावची शान — इन्स्पायर अवॉर्डमध्ये श्रेयस गोळेची राष्ट्रीय पातळीवरील भव्य झेप
महाबळेश्वर प्रतिनिधी –
भंडारा जिल्ह्यात शहापूर येथे 27 ते 29 नोव्हेंबर 2025 दरम्यान पार पडलेल्या राज्यस्तरीय इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनात सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढवणारी अभिमानाची घटना घडली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोसे येथील विद्यार्थी श्रेयस विजय गोळे याने सादर केलेल्या ‘एअरपोर्ट बॅगेज डायव्हर्टर सिस्टीम विथ क्यूआर’ या अभिनव उपकरणाची निवड राष्ट्रीय स्तरावरील इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शनासाठी झाली आहे. सातारा जिल्ह्यातून राष्ट्रीय पातळीवर पाच उपकरणांची निवड झाली असून, यामध्ये जिल्हा परिषद शाळांमधून निवडले गेलेले एकमेव मॉडेल म्हणजे भोसे शाळेचे हे यंत्र.
या प्रदर्शनामध्ये NIF चे वैज्ञानिक सुनील भास्कर आणि संध्या तिवारी यांनी सुमारे 350 उपकरणांचे परीक्षण करून सर्वोत्तम कल्पनांची निवड केली. त्यात श्रेयसचे मॉडेल ठळकपणे उठून दिसले. श्रेयसला मार्गदर्शन देणारे सातारा जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते अमित कारंडे यांचे योगदान विशेषत्वाने उल्लेखनीय आहे.
श्रेयसने सादर केलेली QR आधारित बॅगेज डायव्हर्टर प्रणाली ही एअरपोर्टवरील बॅगेज हँडलिंग प्रक्रियेला अधिक वेगवान, अचूक आणि तांत्रिकदृष्ट्या परिणामकारक बनवणारी कल्पना मानली जात आहे. प्रवाशांच्या बॅगेजवरील QR टॅग स्कॅन करून त्यातील माहितीच्या आधारे सामानाची आपोआप योग्य दिशेने वळवणारी ही प्रणाली मानवी चुका टाळते आणि बॅगेज व्यवस्थापन अधिक सुरक्षित व अत्यंत कार्यक्षम बनवते. तिकीट काउंटरपासून विमानात लोड होणाऱ्या विभागापर्यंत बॅगेज सुरक्षित, वेगाने आणि अचूक पोहोचवण्यासाठी ही संकल्पना उपयुक्त ठरू शकते, असा तज्ञांचा अंदाज आहे.
श्रेयसच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संपूर्ण शिक्षण विभागातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. मा. गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, गटशिक्षणाधिकारी रमेश गंबरे, इन्स्पायर अवॉर्ड जिल्हा समन्वयक उबाळे सर, शिक्षण विस्तार अधिकारी सुरेंद्र भिलारे, केंद्रप्रमुख संजय पारठे, डी.डी. ढेबे, चंद्रकांत जंगम, विनायक पवार, शिक्षक बँकेचे संचालक संजय सकपाळ, शिक्षक संघाचे अध्यक्ष रवींद्र भिलारे, शिक्षक समिती अध्यक्ष वसीम वारुणकर यांनी श्रेयसचे मनःपूर्वक कौतुक केले.
तसेच सुजाता ढेबे, आनंदा पारठे, उस्मान तांबोळी, कविता नेवसे, विष्णू ढेबे, अमोल गायकवाड यांनी उपकरण निर्मिती व सादरीकरणासाठी सहकार्य केले. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राम गोळे, उपाध्यक्ष आनंदा मोरे व सर्व सदस्यांनीही राज्यस्तरावर मिळवलेल्या या यशाचा अभिमान व्यक्त करत, “हे यश शाळेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल,” अशी भावना व्यक्त केली.
श्रेयस गोळेच्या कल्पकतेने, परिश्रमाने आणि मार्गदर्शक शिक्षकांच्या निष्ठेने भोसे शाळेने राष्ट्रीय पातळीवर झेंडा रोवला आहे. आता राष्ट्रीय स्तरावरील अंतिम फेरीतही हा नवा तारा सातारा जिल्ह्याची मान वाढवेल, अशी सर्वांना आशा आहे.
Comments
Post a Comment