सुंदरराव मोरे महाविद्यालयात एड्स जनजागृती फेरी आणि विशेष व्याख्यान



सुंदरराव मोरे महाविद्यालयात एड्स जनजागृती फेरी आणि विशेष व्याख्यान

पोलादपूर प्रतिनिधी –

पोलादपूर, १ डिसेंबर २०२५ : जागतिक एड्स दिन आणि सप्ताहानिमित्त शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ, महाड संचलित सुंदरराव मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये एड्स जनजागृतीसाठी विशेष व्याख्यान आणि प्रचारफेरीचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि आजीवन अध्ययन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या आयसीटीसी केंद्राच्या सहकार्याने झालेल्या या उपक्रमाचे मार्गदर्शन ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भानुदास गिरी यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी एनएसएसचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. राम बरकुले यांनी आयसीटीसी विभागातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ सौ. सीता जाधव आणि समुपदेशक श्री. अमोल नारखेडे यांचे स्वागत केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना सौ. सीता जाधव यांनी एड्स या आजारासंदर्भात समाजात अद्याप मोठ्या प्रमाणात गैरसमज असल्याचे सांगत तरुण पिढीने शास्त्रीय माहितीच्या आधारे योग्य जनजागृती करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले. एचआयव्ही संक्रमणाच्या पद्धती, चाचण्यांचे प्रकार, लक्षणे आणि सध्या उपलब्ध असलेल्या उपचारपद्धती याबाबत त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.

सौ. जाधव म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेमार्फत आयसीटीसी केंद्राद्वारे एचआयव्ही बाधित रुग्णांना त्यांची ओळख गोपनीय ठेवून एआरटी उपचार व समुपदेशन मोफत दिले जाते. आधुनिक उपचारपद्धती आणि योग्य जीवनशैली यांच्या साहाय्याने एचआयव्ही बाधित रुग्ण दीर्घकाळ आणि उत्तम आयुष्य जगू शकतात, तसेच एचआयव्ही बाधित गरोदर महिलांच्या योग्य उपचारांमुळे नवजात शिशूला संक्रमणापासून वाचवणेही शक्य होते. स्वतःची एचआयव्ही चाचणी स्वयंप्रेरणेने करून घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे सांगत त्यांनी १०९७ या टोल-फ्री हेल्पलाइनद्वारे उपलब्ध माहितीचीही माहिती उपस्थितांना दिली. सुरक्षित लैंगिक संबंध, कंडोमचा वापर, एक पत्नी व्रत आणि एचआयव्ही बाधितांशी समानतेची वागणूक या महत्त्वाच्या मुद्द्यांवरही त्यांनी प्रकाश टाकला.

समुपदेशक श्री. अमोल नारखेडे यांनी विद्यार्थ्यांना एड्स आणि एचआयव्ही संबंधी सजगता, प्रतिबंधक उपाययोजना आणि सामाजिक जबाबदारी यांबाबत मार्गदर्शन केले. तर प्रा. डॉ. राम बरकुले यांनी विवाह ठरवताना पत्रिका-पंचांगापेक्षा नियोजित वधू-वरांच्या आरोग्य तपासणीला – विशेषत: एचआयव्ही चाचणीला – प्राधान्य देण्याची गरज अधोरेखित केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सुनील बलखंडे यांनी एड्स व एचआयव्ही संदर्भातील समाजातील गैरसमज दूर करून तरुणाईपर्यंत वैज्ञानिक माहिती पोहोचवण्यासाठी अशा उपक्रमांचे मोठे महत्त्व असल्याचे सांगितले. पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या आयसीटीसी केंद्राने राबविलेल्या जनजागृती उपक्रमांचे त्यांनी विशेष कौतुक केले. एड्सकडे कलंक म्हणून न पाहता बाधित रुग्णांबरोबर सहानुभूतीने व समभावाने वागण्याचे आवाहन त्यांनी अखेरीस केले.

महाविद्यालयातील एनएसएस स्वयंसेवकांनी या कार्यक्रमानंतर शहरातून जनजागृती फेरी काढत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. जागतिक एड्स दिनानिमित्त आयोजित हा उपक्रम महाविद्यालय परिसरात आणि विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीचा महत्त्वपूर्ण संदेश देऊन पूर्ण झाला.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl