महाबळेश्वरचे ‘मधग्राम’मांघर मिशन स्वच्छतेकडे!मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत मुख्य तापोळा रस्त्यावर स्वच्छता मोहीम उत्साहात

 महाबळेश्वरचे ‘मधग्राम’मांघर  मिशन स्वच्छतेकडे!
मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत मुख्य तापोळा रस्त्यावर स्वच्छता मोहीम उत्साहात

✍️राजेश सोंडकर,

महाबळेश्वर प्रतिनिधी : 

महाराष्ट्रातील पहिले ‘मधाचे गाव’ म्हणून लौकिक प्राप्त केलेल्या मांघर (ता. महाबळेश्वर) येथे मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत मंगळवारी भव्य स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. पर्यावरण संवर्धन, स्वच्छ गावे आणि लोकसहभाग या तत्त्वांवर आधारित असलेल्या या उपक्रमात ग्रामस्थ, महिला वर्ग, युवक आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मुख्य तापोळा रस्त्याला अक्षरशः नवीन रूप दिले.

ग्रामपंचायतीने समृद्ध ग्रामपंचायत अभियानाचा भाग म्हणून मांघर फाटा ते थेट मांघर गाव या मुख्य मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. या मार्गाच्या दुतर्फा साचलेला प्लास्टिक व विविध प्रकारचा कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली. गावाला स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनवण्याच्या उद्देशाने घेतलेल्या या उपक्रमात ग्रामस्थांच्या हातून सामूहिक कामाचा सुंदर मेळ घडून आला.

स्वच्छता मोहिमेला मांघर ग्रामपंचायत आणि वनविभागाचा समन्वयपूर्ण पाठिंबा मिळाला. या वेळी वनविभाग (मांघर बीट) चे वनरक्षक बा. भ. मराडे आणि वनविभाग (चिखली बीट) चे टी. स. निकम यांनी सहभागी होत ग्रामस्थांना प्रोत्साहित केले. ग्रामपंचायतीतर्फे सरपंच गणेश जाधव, सदस्य आणि गावचे अध्यक्ष नानासाहेब जाधव यांनी मोहिमेचे नेतृत्व करत गावकऱ्यांना स्वच्छतेची एकत्रित हाक दिली.

महिला मंडळ, युवा वर्ग, स्थानिक नागरिक यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत रस्त्यांची साफसफाई, कचरा संकलन आणि परिसर स्वच्छता यात आपला वाटा उचलला. स्थानिक पातळीवर राबवलेल्या या उपक्रमामुळे मांघर गावाच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच पर्यावरण रक्षणाचा संदेशही अधोरेखित झाला आहे.

मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत मांघर गावाने राबवलेली ही स्वच्छता मोहीम ‘स्वच्छता हीच सेवा’ या भावनेला नव्याने उजाळा देत ग्रामविकासासाठी लोकसहभाग किती परिणामकारक ठरू शकतो, याचे उत्तम उदाहरण ठरली आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl