जखमी उदमांजराला जीवदान; वनविभाग व सह्याद्री प्रोटेक्टर्सची धडाकेबाज रेस्क्यू मोहीम
जखमी उदमांजराला जीवदान; वनविभाग व सह्याद्री प्रोटेक्टर्सची धडाकेबाज रेस्क्यू मोहीम
✍️मिलिंद काळे,
महाबळेश्वर प्रतिनिधी –
अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या उदमांजराला महाबळेश्वर–तापोळा रोडवरून वेळीच रेस्क्यू करून उपचार देत पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. वनविभाग आणि ‘सह्याद्री प्रोटेक्टर्स’च्या जवानांनी तातडीने दाखविलेल्या कार्यवाहीमुळे या वन्यप्राण्याचा जीव वाचविणे शक्य झाले. गुरुवारी रात्रीच्या सुमारास रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या उदमांजराची माहिती संताजी शिंदे यांनी सह्याद्री प्रोटेक्टर्सच्या जवानांना दिली. जवानांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता प्राणी गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने ही बाब वनविभागाला कळवली आणि काही क्षणांतच वनक्षेत्रातील कर्मचारीही घटनास्थळी दाखल झाले.
जखमी उदमांजराला सुरक्षितरीत्या पकडून सह्याद्री प्रोटेक्टर्सचे जवान आणि वनकर्मचारी यांनी संयुक्तपणे त्याला येथील हिरडा वन विश्रामगृहात आणले. रात्रीभर देखरेख केल्यानंतर पुढील दिवशी त्यावर औषधोपचार करण्यात आले. प्रकृती सुधारल्यानंतर उदमांजराला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
या बचाव मोहिमेत वनक्षेत्रपाल महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुनील लांडगे, वनरक्षक लहू राऊत तसेच सह्याद्री प्रोटेक्टर्सचे हर्ष साळुंखे आणि साहिल सुतार यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. महाबळेश्वरचा परिसर दाट जंगलांनी वेढलेला असून विविध प्रकारचे वन्यजीव येथे वास्तव्यास आहेत. रात्रीच्या वेळी अन्नाच्या शोधात हे प्राणी रस्ते ओलांडताना दिसतात आणि त्यामुळे अपघाताच्या घटना घडतात. अशाच घटनांत अनेक प्राण्यांचे प्राणही जातात.
जंगल परिसरातील रस्त्यावरून प्रवास करताना वाहनांचा वेग नियंत्रित ठेवावा, वेगमर्यादांचे पालन करावे आणि सतर्कतेने वाहन चालवावे, असे आवाहन वनविभाग आणि सह्याद्री प्रोटेक्टर्स यांच्या वतीने करण्यात आले आहे. वन्यजीवांचे संरक्षण हे सर्वांचे सामूहिक कर्तव्य असून नागरिकांनीही अशा प्रसंगी तातडीने माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment