वर्षा व्हिला’ बंगल्यावर अश्लील नृत्याचा पर्दाफाशपाचगणी पोलिसांची धडक कारवाई ; १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त – ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
‘वर्षा व्हिला’ बंगल्यावर अश्लील नृत्याचा पर्दाफाश
पाचगणी पोलिसांची धडक कारवाई ; १८ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त – ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
रविकांत बेलोशे,
पाचगणी प्रतिनिधी :
पाचगणी : जागतिक पर्यटन नकाशावर चमकणाऱ्या पाचगणीच्या खिंगर परिसरातील ‘वर्षा व्हिला’ बंगल्यावर सुरु असलेल्या अश्लील नृत्याच्या कार्यक्रमावर पाचगणी पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री धडक छापा टाकत कारवाई केली. या छाप्यात पोलिसांनी हॉटेल मालकासह ६ जणांवर गुन्हा दाखल करून १८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण पर्यटन पट्ट्यात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खिंगर येथे असलेल्या ‘वर्षा व्हिला’ बंगल्यात रात्री उशिरापर्यंत संगीताच्या तालावर उत्तान कपड्यांत महिलांकडून अश्लील नृत्याचे सत्र सुरू होते.
‘गायिका’ आणि ‘महिला वेटर’ या नावाखाली बारबाला वेगवेगळ्या ठिकाणांहून आणण्यात आले होते. या महिलांनी हॉलमध्ये आलेल्या गिऱ्हाईकांसमोर अश्लील हावभाव करत नृत्य केले. काही गिऱ्हाईकांनी या नर्तकांबरोबर नाच करत पैशांच्या नोटांचा वर्षाव केल्याचे पोलिसांना छाप्यात दिसून आले.
पोलिसांनी नंतर या जागेवरून मोठ्या प्रमाणात नोटा, साऊंड सिस्टीम, लाईट सिस्टीम, मोबाईल, डिव्हीआर आणि एक कार असा १८ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल साळुंखे (वाई विभाग) यांच्या निर्देशानुसार ही गुप्त कारवाई करण्यात आली.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना खास बातमीदारामार्फत ही माहिती मिळताच त्यांनी सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी पहाटे १.१५ वाजता आपल्या पथकासह बंगल्यावर छापा टाकला.
या कारवाईत सहाय्यक फौजदार कैलासनाथ रसाळ, हवालदार श्रीकांत कांबळे, हवालदार विठ्ठल धायगुडे, पोलिस कॉन्स्टेबल उमेश लोखंडे, व्ही.यू. नेवसे, महिला पोलिस कॉन्स्टेबल श्रुती गोळे यांनी सहभाग घेतला.
या प्रकरणात हॉटेल मालकासह एकूण ६ जणांवर भारतीय दंड संहितेच्या कलम २९६, २२३, ३५५ तसेच
‘महाराष्ट्र हॉटेल आणि मध्यपानगृहातील अश्लील नृत्यावर प्रतिबंध व महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण अधिनियम २०१६’ च्या कलम ३ व ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि दिलीप पवार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
या कारवाईमुळे पर्यटन नगरी पाचगणीच्या प्रतिमेला गालबोट लागले असून, या भागातील वाढत्या “नाईट पार्टी” आणि “व्हिला क्लब” संस्कृतीबद्दल चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
“पर्यटन विकासाच्या नावाखाली नैतिक अधःपतन होऊ लागले आहे का?” असा सवाल स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.
पाचगणी, महाबळेश्वर हे कुटुंबांसह येणाऱ्या पर्यटकांचे आकर्षण असलेले ठिकाण असून अशा प्रकारच्या घटनांमुळे स्थानिक प्रशासन आणि पर्यटन क्षेत्राच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
💬 स्थानिक प्रतिक्रिया :
“पाचगणी हे संस्कृती आणि स्वच्छ वातावरणासाठी ओळखले जाते. अशा बेकायदेशीर पार्ट्या थांबवण्यासाठी पोलीस आणि ग्रामस्थांनी संयुक्तपणे पावले उचलायला हवीत.”
— एक स्थानिक नागरिक
Comments
Post a Comment