महाबळेश्वरमध्ये भारतीय महिला संघाच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोषइनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वरच्यावतीने भव्य रॅलीचे आयोजन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
महाबळेश्वरमध्ये भारतीय महिला संघाच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष
इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वरच्यावतीने भव्य रॅलीचे आयोजन; विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
✍️प्रेषित गांधी
महाबळेश्वर प्रतिनिधी –
भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिला आयसीसी महिला विश्वचषक जिंकत देशाचा इतिहास नव्याने लिहिला आहे. नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव करून विश्वविजेतेपद पटकावले. या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष संपूर्ण देशभरात होत असताना, महाबळेश्वर शहरातही या विजयाचा उत्साह अनोख्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
इनरव्हील क्लब ऑफ महाबळेश्वर च्यावतीने अध्यक्षा वर्षा संतोष पार्टे यांच्या संकल्पनेतून आज भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथून झाली. “भारत माता की जय”, “नारी शक्तीचा विजय असो”, “हिप हिप हुर्रे – इंडिया चॅम्पियन!” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. मुख्य बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, मस्जिद रस्ता या मार्गाने रॅली पुन्हा नेताजी सुभाषचंद्र बोस चौक येथे एकत्र आली. महिलांच्या हातात तिरंगा आणि बॅनर होते; अनेक जणांनी क्रिकेट बॅट, बॉल, तसेच भारतीय संघाचे झेंडे हातात घेत जल्लोष केला.
या रॅलीमध्ये इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा पार्टे यांच्यासह मुक्ता कोमटी, सपना अरोरा, राधा मुक्कावार, अदिती भांगडिया, नेहा साळवी, गीत नागपाल, अश्विनी कोमटी, भक्ती जाधव, गायत्री जाधव, लक्ष्मी यरलगड्डा, वैशाली चौरसिया, तसेच इनरव्हील क्लब ऑफ पुणेच्या आयपीपी स्वाती अय्यर आदी मान्यवर उपस्थित होत्या.
यावेळी माजी नगरसेविका स्वाती भांगडिया, शोभा महाबळेश्वरवाला, उषाताई ओंबळे, पार्वती भांगडिया यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाचे अभिनंदन करत, “या विजयाने प्रत्येक भारतीय महिलेला नवचैतन्य दिले आहे; आजच्या मुलींसाठी हे प्रेरणादायी उदाहरण आहे,” असे प्रतिपादन केले.
रॅलीमध्ये एम.ई.एस. शाळा आणि गिरिस्थान प्रशालेतील विद्यार्थिनींनी रंगीबेरंगी झेंडे, पोस्टर्स आणि घोषणांनी वातावरण भारावून टाकले. शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक आणि पालकवर्ग यांचीही उत्साही उपस्थिती होती. विद्यार्थ्यांनी भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या पराक्रमाचे कौतुक करत “We are proud of Team India!” अशा फलकांनी देशप्रेमाचा संदेश दिला.
रॅलीच्या समारोपप्रसंगी इनरव्हील क्लब अध्यक्षा वर्षा पार्टे यांनी सांगितले, “भारतीय महिला क्रिकेट संघाने केवळ विजय मिळवला नाही, तर महिला सक्षमीकरणाचे नवे पर्व सुरू केले आहे. या रॅलीतून आम्ही सर्वांना हेच सांगू इच्छितो की – प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपले कौशल्य सिद्ध करावे.”
कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून मुक्ता कोमटी यांनी काम पाहिले, तर आभार प्रदर्शन नेहा साळवी यांनी मानले.
या रॅलीमुळे संपूर्ण महाबळेश्वर शहर देशभक्ती आणि अभिमानाच्या भावनेने उजळून निघाले. “जय हिंद, जय भारत!” च्या जयघोषात नागरिकांनी भारतीय महिला संघाच्या विश्वविजयाचा उत्सव साजरा केला.
Comments
Post a Comment