प्रतापगडावर शाहू महाराजांनी घेतले भवानी मातेच दर्शन व अभिषेक; स्थानिक ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत
प्रतापगडावर शाहू महाराजांनी घेतले भवानी मातेच दर्शन व अभिषेक; स्थानिक ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत
✍️जितेंद्र कारंडे,
प्रतापगड प्रतिनिधी –
छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज आणि उदयनराजे भोसले यांचे चुलते श्रीमंत शाहू महाराज यांनी आज प्रतापगडावर भवानी मातेस साक्षात भेट देत दर्शन व अभिषेक करून भक्तीपूर्ण वातावरणात आपल्या भेटीची सांगता केली. त्यांच्या आगमनाची माहिती समजताच परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असलेल्या प्रतापगड किल्ल्यावर शाहू महाराज आज सकाळी पोहोचले. भवानी मातेच्या मंदिरात त्यांनी विधीवत पूजा-अर्चा आणि अभिषेक करून किल्ल्याच्या रक्षणकर्त्या मातेचे आशीर्वाद घेतले. मंदिर परिसरात ढोल-ताशांच्या निनादाने आणि पारंपरिक घोषणांनी वातावरण निनादून गेले.
शाहू महाराज प्रतापगडावर पोहोचताच गडावरील स्थानिक ग्रामस्थ, महिला मंडळे, तथा ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे हार्दिक स्वागत केले. खासकरून तरुणांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या घोषणा देत महाराजांचे स्वागत करत परिसरात ऐतिहासिक उत्साह निर्माण केला.
स्थानिकांनी शाहू महाराजांना भवानी मातेची परंपरा, मंदिर विकास प्रश्न, पर्यटन व्यवस्था यांबद्दलही माहिती दिली. महाराजांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानत प्रतापगडाच्या विकासासाठी आवश्यक सहकार्य करण्याचा विश्वास दिला.
सुट्टीच्या दिवशी असल्याने प्रतापगडावर भाविक आणि पर्यटकांचीही मोठी गर्दी पाहायला मिळाली. शाहू महाराजांच्या आगमनामुळे या गर्दीत आणखी वाढ झाली. पर्यटकांनी महाराजांसोबत छायाचित्रे घेण्याचा प्रयत्न केला तर काहींनी प्रतापगडाच्या इतिहासाबाबत त्यांच्याशी संवाद साधला.
भवानी मातेच्या दर्शनानंतर शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाची आणि प्रतापगडाच्या संरक्षणाची महत्त्वाची आठवण करून दिली.
त्यांनी सांगितले की,
“हा किल्ला केवळ दगड-मातीचा नाही; हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा गड आहे. त्याची जपणूक, संवर्धन आणि स्वच्छता यासाठी प्रत्येकाने पुढे यायला हवे.”
शाहू महाराजांच्या या भेटीमुळे प्रतापगड परिसरात दिवसभर चर्चेचा विषय राहिला. स्थानिकांनी व्यक्त केले की अशा भेटीमुळे गडावरील विविध समस्या, पायाभूत सुविधा, तसेच भवानी माता मंदिराचे संवर्धन याकडे अधिक लक्ष वेधले जाऊ शकते.
Comments
Post a Comment