महाबळेश्वर तालुक्यात रस्त्यांची दयनीय अवस्था; पर्यटकांसह स्थानिकांना रोज मातीचा प्रसाद
महाबळेश्वर तालुक्यात रस्त्यांची दयनीय अवस्था; पर्यटकांसह स्थानिकांना रोज मातीचा प्रसाद
महाबळेश्वर –
महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी–महाबळेश्वर रस्त्यांची स्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे. वारंवार डांबर टाकूनही मुसळधार पावसामुळे ते वाहून जात असल्याचे प्रशासन सांगत असले, तरी मूलभूत दुरुस्तीच्या कामात कोणतीही ठोस सुधारणा दिसत नाही.
या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या “HAM प्रोजेक्ट” अंतर्गत सुरूर–पोलादपूर मार्गाचे काम सुरू करण्यात आले असून सुरूर–वाई व पोलादपूर घाटमार्गावर काही ठिकाणी प्राथमिक टप्प्यातील काम सुरू आहे. मात्र महाबळेश्वर भागात या कामाची प्रत्यक्ष सुरुवात अद्याप लांबणीवरच आहे.
दरम्यान, रस्ते विकास महामंडळामार्फत सुरू असलेल्या कामाची प्रतीक्षा करत असताना महाबळेश्वरकरांसह पर्यटकांना अक्षरशः रोज माती खावी लागत आहे. दुचाकीस्वार तर रस्त्यावरून प्रवास करताना पूर्णपणे त्रस्त झाले आहेत. राज्य शासनाच्या अखत्यारीतील पाचवड–कुडाळ–मेढा मार्गावर युद्धपातळीवर दहा–पंधरा मोठ्या मशीनरीसह चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू असताना, सुरूर–वाई–महाबळेश्वर या सर्वात वर्दळीच्या रस्त्यावर केवळ दोन ते चार मशीनरीच्या जोरावर सुरू असलेले काम नागरिकांच्या रोषाला कारणीभूत ठरत आहे.
यामुळे शासनाला खरोखर शाश्वत विकास हवा आहे का, की पर्यटकांना महाबळेश्वरपासून दूर ठेवण्यासाठी हे कटकारस्थान रचले जात आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पर्यावरणीय इको-सेंसिटिव्ह झोनमधील रस्त्यांसाठी सिमेंटीकरणाची मर्यादा असतानाही या भागात मोठ्या प्रमाणावर सिमेंट रस्त्यांची उभारणी होत आहे. परिणामी धुळीचे प्रमाण वाढून पर्यावरणाला अधिक धोका निर्माण होत आहे. हवेतील धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचेही निदर्शनास येत आहे. याकडे प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे उघडपणे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
महाबळेश्वरसारख्या संवेदनशील पर्यटन क्षेत्राचा अशापद्धतीने होत असलेला विनाश पाहून नागरिक संतप्त आहेत. भविष्यातील पिढ्यांसाठी आपण काय ठेवणार आहोत याचा विचारही न करता येथील नेतृत्व बघ्याची भूमिका घेत असल्याची तीव्र भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
नुकताच वेण्णा लेक परिसरातील काही हॉटेल व्यावसायिकांनी एकत्र येऊन ठेकेदाराशी बैठक घेऊन महिनाभर रोज तीन वेळा टॅंकरने पाणी मारण्यास भाग पाडले. परंतु त्यामुळे फक्त एक–दोन किलोमीटरचा प्रश्न सुटला. येथे येणाऱ्या पर्यटकांना, शाळकरी विद्यार्थ्यांच्या सहलींना तसेच रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना माती खावी लागत आहे, याचा शासनाला विसर पडल्याचे दिसते.
शहरातील अधिकारी वर्ग देखील रोज याच रस्त्याने प्रवास करत असला तरी उडणारे धुळीचे लोट केवळ स्थानिक जनतेलाच जाणवत आहेत, ही बाब चिंताजनक आहे. एकेकाळी महाबळेश्वरची हवा घेण्यासाठी पर्यटक व स्थानिक वाहनांच्या खिडक्या उघडत आणि दीर्घ श्वास घेऊन स्वच्छ हवेची तहान भागवत असत. मात्र आता धुळीच्या लोटांमुळे अपघाताची भीती मनात ठेवून वाहन चालवावे लागत आहे.
निर्ढावलेल्या व्यवस्थेचे झाकलेले डोळे उघडण्यासाठी प्रसारमाध्यमांकडून केलेल्या प्रयत्नांकडेही दुर्लक्ष होत आहे, ही या पर्यटननगरीची मोठी शोकांतिका आहे. पर्यटन हिरावून घेतले जात असताना देखील शांतपणे पाहण्याशिवाय नागरिकांना पर्याय राहत नाही.
एकेकाळी निसर्गाच्या सान्निध्यात विश्रांतीसाठी पर्यटक महाबळेश्वरला येत असत; परंतु आता येथील हवाच अस्वच्छ झाल्याने या पर्यटननगरीचे भवितव्य अंधारात जात असल्याचे ज्येष्ठ नागरिक बोलताना दिसतात.
शासनाला नेमका विकास कुणासाठी करायचा आणि विनाश कुणाचा करायचा हेच समजेनासे झाले आहे. ब्रिटिशकालीन महाबळेश्वर या ऐतिहासिक पर्यटनस्थळाचे नामोनिशाण मिटवायचे आहे का, असा संतप्त सवाल शहरातील अनेक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
Comments
Post a Comment