महाबळेश्वर येथे नामनिर्देशन प्रक्रियेवरील मार्गदर्शन सत्र उत्साहात संपन्न निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के व सहायक अधिकारी योगेश पाटील यांचे सविस्तर मार्गदर्शन
महाबळेश्वर येथे नामनिर्देशन प्रक्रियेवरील मार्गदर्शन सत्र उत्साहात संपन्न
निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के व सहायक अधिकारी योगेश पाटील यांचे सविस्तर मार्गदर्शन
✍️जितेंद्र कारंडे,
प्रतापगड प्रतिनिधी —
महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेबाबत योग्य माहिती व मार्गदर्शन मिळावे यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातर्फे विशेष मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. हे सत्र शनिवार, दि. ८ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता महाबळेश्वर येथील खादी ग्रामोद्योग सभागृहात पार पडले.
या बैठकीत निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी योगेश पाटील यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून नामनिर्देशन पत्र दाखल करताना आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींचे सविस्तर मार्गदर्शन केले. उमेदवारांनी सादर करावयाच्या आवश्यक कागदपत्रांची यादी, अर्ज भरण्याच्या अटी, अंतिम मुदती, तसेच नामनिर्देशन रद्द होण्याच्या शक्यता असलेल्या त्रुटी याबाबत सखोल माहिती देण्यात आली.
तसेच भारत निवडणूक आयोगाच्या आदर्श आचारसंहिता संदर्भातही मार्गदर्शन करण्यात आले. निवडणूक काळात शासकीय संसाधनांचा वापर, प्रचारातील मर्यादा, आणि सामाजिक माध्यमांवरील आचारसंहितेचे पालन या विषयांवर अधिकाऱ्यांनी स्पष्ट सूचना दिल्या.
सदर सत्रात उपस्थित उमेदवार, पक्ष प्रतिनिधी व पत्रकारांनी आपापल्या शंकांचे निरसन केले. अनेक उमेदवारांनी ही बैठक अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत व्यक्त केले.
या बैठकीसाठी नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी, सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष, इच्छुक उमेदवार तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या मार्गदर्शन सत्रामुळे निवडणुकीच्या प्रक्रियेत पारदर्शकता व सुलभता निर्माण होऊन उमेदवारांना नामनिर्देशन पत्र भरताना कोणत्याही प्रकारचा गोंधळ होणार नाही, असा विश्वास निवडणूक विभागाने व्यक्त केला.
Comments
Post a Comment