एकाच दिवशी ९९ ग्रामपंचायतींनी केली प्लास्टिकमुक्त गावांची घोषणावाई तालुक्यात लोकसहभागातून स्वच्छतेचा नवा इतिहास
एकाच दिवशी ९९ ग्रामपंचायतींनी केली प्लास्टिकमुक्त गावांची घोषणा
वाई तालुक्यात लोकसहभागातून स्वच्छतेचा नवा इतिहास
✍️विजय जाधव,
सातारा प्रतिनिधी
वाई तालुक्यात स्वच्छतेच्या दिशेने मोठा आणि प्रेरणादायी टप्पा गाठत मंगळवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी तब्बल ९९ ग्रामपंचायतींनी एकाच दिवशी प्लास्टिक संकलन मोहीम राबवून कायमस्वरूपी प्लास्टिक बंदीची घोषणा केली. गटविकास अधिकारी विजयकुमार परिट यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाने तालुक्याला राज्यभरात विशेष ओळख मिळवून दिली आहे.
नाविन्यपूर्ण उपक्रमांची सलग मालिका
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आणि माझी वसुंधरा अभियानाच्या धर्तीवर सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्ञा माने यांच्या मार्गदर्शनाखाली वाई तालुक्यात सलग अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वीपणे होत आहेत.
गटविकास अधिकारी विजयकुमार परीट हे केवळ प्रशासनिक अधिकारी न राहता सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख निर्माण करत आहेत. जलसंधारण, वृक्षसंवर्धन, शिक्षण, आरोग्य, स्वच्छता अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी पाणी फाऊंडेशन, नाम फाऊंडेशन तसेच अनेक विभागांच्या माध्यमातून प्रशंसनीय काम केले आहे.
प्लास्टिक संकलन व बंदी मोहीमेची भव्य अंमलबजावणी
दिवसभर चाललेल्या या उपक्रमामध्ये ९९ गावांमध्ये प्लास्टिक संकलनाबरोबरच गावांनी कायमस्वरूपी प्लास्टिक बंदीचा ठराव मंजूर केला.
यासाठी तालुकास्तरीय सर्व खाते प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांना गावनिहाय संपर्क अधिकाऱ्यांची जबाबदारी देण्यात आली.
मोहीमेअंतर्गत खालील उपक्रम राबविण्यात आले—
- दुकानदारांना प्लास्टिक बंदीच्या अधिकृत नोटिसा देण्यात आल्या
- प्लास्टिक वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा
- गावातील प्रमुख ठिकाणी स्वच्छता व दंडात्मक सूचना फलक लावले
- ग्रामस्थ व युवकांनी मोठ्या संख्येने श्रमदान करीत प्लास्टिक कचरा गोळा केला
- संकलित प्लास्टिक भंगार विक्रेत्यांकडे पुनर्वापरासाठी सुपूर्द
- नशामुक्त भारत अभियानांतर्गत व्यसनमुक्तीची शपथ
- घरकुल पूर्णत्व अभियानास चालना –
- मंजूर घरकुलांचे भूमिपूजन
- पाया खुदाई
- पूर्णत्व टप्प्यातील घरकुलांचा अंतिम हप्ता वितरण
स्वच्छतेच्या चळवळीला लोकसहभागाचे बळ
या मोहिमेत सरपंच, ग्रामपंचायत पदाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी, ग्रामस्थ, तसेच उत्साही युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
यामुळे तालुक्यात स्वच्छतेची नवी चेतना निर्माण झाली असून ‘वाई मॉडेल’ राज्यातील इतर तालुक्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
राज्यमंत्री मकरंद पाटील यांचे कौतुक
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा. मकरंद (आबा) पाटील यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत प्रशासकीय यंत्रणा आणि ग्रामस्थांनी दाखविलेल्या एकजुटीचे अभिनंदन केले आहे.
वाई तालुका – स्वच्छतेच्या नव्या उंचीवर
सलग यशस्वी उपक्रमांमुळे वाई तालुका स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि लोकसहभागाच्या क्षेत्रात राज्यभरात चर्चेचा विषय ठरत आहे.
ग्रामपंचायतींचा एकाच दिवशी केलेला प्लास्टिक बंदीचा निर्णय हा भविष्यातील पर्यावरण-संवर्धनाच्या दिशेने महत्त्वाचा मैलाचा दगड ठरत आहे.
Comments
Post a Comment