महाबळेश्वर नगरपालिकेची निवडणूक : प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या हरकतींचा अंतिम निकाल २९ नोव्हेंबरला; संपूर्ण शहराचे लक्ष वाई न्यायालयाकडे
महाबळेश्वर नगरपालिकेची निवडणूक : प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या हरकतींचा अंतिम निकाल २९ नोव्हेंबरला; संपूर्ण शहराचे लक्ष वाई न्यायालयाकडे
✍️महाबळेश्वर प्रतिनिधी ,
दि. २५ नोव्हेंबर —
आगामी महाबळेश्वर नगरपालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी लागलेली बहुप्रतिक्षित लढत आता न्यायालयीन वळणावर पोहोचली आहे. गिरिस्थान नगरविकास आघाडी (नियोजित) चे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार, माजी नगरसेवक कुमार शिंदे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या नामनिर्देशनावर घेतलेल्या हरकती आता अंतिम टप्प्यात दाखल झाल्या आहेत. जिल्हा न्यायालय, वाई येथे २९ नोव्हेंबर रोजी या सर्व हरकतींबाबतचा अंतिम निकाल जाहीर होणार असून महाबळेश्वर शहरातील नागरिक, राजकीय कार्यकर्ते आणि उमेदवार यांचे लक्ष या निकालावर केंद्रीत झाले आहे.
छाननी प्रक्रियेवेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळल्या होत्या हरकती
छाननी प्रक्रियेदरम्यान कुमार शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील लक्ष्मण शिंदे, तसेच लोकमित्र जनसेवा आघाडीचे उमेदवार आणि माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांच्या नामनिर्देशनावर हरकती घेतल्या होत्या.
या हरकतींमध्ये प्रामुख्याने प्लेक्स बोर्ड जाहिरात कर बुडीत असल्याचा आरोप करण्यात आला होता.
यासोबतच—
- प्रभाग १-ब : प्रियांका अजित बावळेकर यांनी विद्या शरद बावळेकर यांच्या विरोधात ‘प्लेक्स जाहिरात कर बाकी’ असल्याची तक्रार दाखल केली होती.
- प्रभाग ६-ब : उमेदवार राहुल अशोक भोसले यांनी संतोष बबन शिंदे यांच्या नामनिर्देशनावरही अशाच स्वरूपाची हरकत नोंदवली होती.
निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मस्के, निवडणूक निरीक्षक सौ. पल्लवी निर्मळ, तसेच सहायक निर्णय अधिकारी योगेश पाटील यांच्या उपस्थितीत सुनावणी घेतली गेली आणि सर्व हरकती फेटाळून उमेदवारांची नामनिर्देशने वैध ठरविण्यात आली.
फेटाळलेल्या हरकतींची न्यायालयात धाव – सुनावणीत तीव्र युक्तिवाद
या निर्णयाविरोधात कुमार शिंदे यांच्यासह इतर काही हरकतदारांनी जिल्हा न्यायालय, वाई येथे अपील दाखल केले.
मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी पार पडली. अपीलकर्त्यांच्या वतीने ऍड. राजेंद्र साळुंखे–किवळकर यांनी उमेदवारांनी जाहिरात कर न भरल्याचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले व निर्णय अधिकाऱ्यांचा निकाल चुकीचा असल्याचा जोरदार युक्तिवाद केला.
न्यायालयाने दोन्ही बाजूंचे मुद्दे ऐकून २९ नोव्हेंबर रोजी अंतिम निर्णय देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
महाबळेश्वरमध्ये राजकीय चर्चांचा भडाका — उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली
या सुनावणीच्या पाश्वभूमीवर महाबळेश्वरमध्ये राजकीय चर्चांना ताप आला आहे.
या निकालामुळे —
- महत्त्वाच्या दोन नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे
- तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन प्रभागांतील उमेदवारांचे
राजकीय भविष्य ठरणार आहे.
निकाल ‘अर्ज कायम’ की ‘अर्ज बाद’, यावर संपूर्ण निवडणूक समीकरण बदलण्याची शक्यता असून उमेदवारांमध्ये चांगलीच धाकधूक निर्माण झाली आहे.
२९ नोव्हेंबर हा महाबळेश्वरसाठी निर्णायक दिवस
महाबळेश्वर नगरपालिकेच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत आता न्यायालयीन निर्णयाचे महत्त्व वाढले आहे.
नगराध्यक्ष पदाची प्रतिष्ठेची लढत, आघाड्यांतील अंतर्गत समीकरणे आणि निवडणुकीची दिशा — हे सर्व काही २९ नोव्हेंबरच्या निकालावर अवलंबून आहे.
महाबळेश्वरचे नागरिक आता उत्सुकतेने वाट पाहत आहेत —
“उमेदवारांचे अर्ज राहणार? की बाद होणार?”
यावर पुढील काही दिवसांतच अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे.
Comments
Post a Comment