मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मेटगुताड येथे सोलार पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ व विकास पाहणी
🌿 मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत मेटगुताड येथे सोलार पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ व विकास पाहणी 🌿
✍️जितेंद्र कारंडे,
प्रतापगड प्रतिनिधी —
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने शनिवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२५ रोजी महाबळेश्वर तालुक्यातील मौजे मेटगुताड येथे ग्रामविकास विभागाच्या वतीने महत्त्वपूर्ण पाहणी कार्यक्रम पार पडला. या वेळी जिल्हा परिषद सातारा यांच्या मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन (IAS) आणि मा. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) श्री. राहुल देसाई यांनी प्रत्यक्ष भेट देऊन ग्रामविकास, जलपुरवठा आणि रोजगारनिर्मिती या विविध उपक्रमांची पाहणी केली.
कार्यक्रमादरम्यान ग्रामस्थांसोबत प्रत्यक्ष संवाद साधून अभियानांतर्गत सुरू असलेल्या तसेच आगामी योजना याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे अधिकारी यांनी कौतुक केले.
या पाहणीदरम्यान मौजे मेटगुताड येथील नळ पाणीपुरवठा योजनेचा सोलर सिस्टीमवर चालविण्याचा शुभारंभ मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमामुळे गावाला शाश्वत आणि अखंड जलपुरवठा मिळणार असून वीजबिलाचा खर्चही मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे.
तसेच लिंगमळा पॉइंट परिसरात गावातील बेरोजगार युवकांना रोजगारनिर्मितीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या प्रकल्पाची पाहणी करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. ग्रामीण भागातील युवकांना स्थानिक स्तरावर रोजगार उपलब्ध करून देणे हे अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे मा. नागराजन यांनी यावेळी नमूद केले.
या पाहणी कार्यक्रमास गटविकास अधिकारी श्री. विजय विभूते, विस्तार अधिकारी (पं.) श्री. सुनील पारठे व श्री. सुनील चिकणे उपस्थित होते.
ग्रामपंचायतीतर्फे सरपंच श्री. भिकन बावळेकर, सदस्य श्री. महादेव ओंबळे, सौ. रेश्मा बावळेकर, सौ. सुनिता बावळेकर, सौ. सुवर्णा बावळेकर आदींनी अधिकारी मंडळाचे स्वागत केले.
ग्रामपंचायत अधिकारी वैभव काळे यांनी आजपर्यंत झालेल्या योजनांच्या कामकाजाचा सविस्तर अहवाल सादर केला. ग्रामस्थांनी विकासकामांबाबत समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या पुढाकाराचे कौतुक केले.
या प्रसंगी उपस्थित अधिकारी व ग्रामस्थांनी एकमुखाने गावाच्या स्वयंपूर्ण आणि शाश्वत विकासासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.
Comments
Post a Comment