कास ग्रामस्थांकडून स्वच्छता मोहीम; तळीरामांच्या पार्ट्या थांबवण्याची मागणी
कास ग्रामस्थांकडून स्वच्छता मोहीम; तळीरामांच्या पार्ट्या थांबवण्याची मागणी
✍️सूर्यकांत पवार,
कास प्रतिनिधी –
जागतिक वारसास्थळाचा मान मिळालेलं आणि फुलांच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी जगभर प्रसिद्ध असलेलं कास पठार सध्या पर्यटकांच्या गर्दीने गजबजलेले आहे. मात्र, या ठिकाणी काही पर्यटकांकडून होणाऱ्या गैरवर्तनामुळे परिसराची नैसर्गिक शुचिता धोक्यात येत आहे. कास गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत स्वच्छता मोहीम राबवून पर्यावरण संवर्धनाचा उत्कृष्ट संदेश दिला आहे.
कास पठारावर पर्यटनानंतर काही स्थानिक व बाहेरील पर्यटकांकडून दारू पिणे, मटणाच्या पार्ट्या करणे, प्लास्टिकचा कचरा आणि दारूच्या बाटल्या फेकणे असे प्रकार वाढले आहेत. या प्रकारामुळे पठार आणि तलाव परिसराची शोभा मावळत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे कास गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत परिसरातील कचरा, प्लास्टिक, दारूच्या बाटल्या गोळा करून त्याची योग्य विल्हेवाट लावली.
या उपक्रमानंतर ग्रामस्थांनी सातारा नगरपालिकेला आवाहन केले की, कास पठार व तलाव परिसरात दररोज स्वच्छता कर्मचारी नेमण्यात यावेत तसेच पर्यटकांना स्वच्छतेचे मार्गदर्शन करणारे फलक व सूचना बोर्ड लावावेत. येथील सौंदर्य जपण्यासाठी सातारा पोलिसांनी कास परिसरात गस्त वाढवून दारू पिणारे व अनुशासनभंग करणारे पर्यटकांवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली.
कास तलाव परिसरात नुकत्याच सुरू झालेल्या बोटिंग आणि इतर पर्यटन सुविधा पर्यटकांसाठी आकर्षण ठरत असल्या तरी या सुविधा टिकवण्यासाठी स्वच्छता आणि शिस्त गरजेची असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांनी या सर्व उपक्रमाची नियमितता राखून कासला पुन्हा एकदा स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पर्यटनस्थळ बनवण्याचा संकल्प केला.
या स्वच्छता मोहिमेत पुढील ग्रामस्थांनी सहभाग घेतला —
सतीश किर्दत, राणू किर्दत, विकास किर्दत, नितीन सुर्वे, विजय किर्दत, सुजित जांभळे, महेश शेलार, योगेश शेलार तसेच ग्रामस्थ कास यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.
या सर्व ग्रामस्थांच्या प्रयत्नांमुळे “स्वच्छ कास, सुंदर कास” हा संदेश पर्यटकांपर्यंत पोहोचला असून, स्थानिकांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment