महाबळेश्वरात उद्या मोठी राजकीय हलचल ; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम
महाबळेश्वरात उद्या मोठी राजकीय हलचल ; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम
✍️जितेंद्र कारंडे,
प्रतापगड प्रतिनिधी–
महाबळेश्वर तालुक्यातील राजकीय वातावरण उद्या आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधील श्री सुभाष लक्ष्मण कारंडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते उद्या शिवसेना पक्षात जाहीरपणे प्रवेश करणार आहेत. महत्त्वपूर्ण असलेला हा पक्ष प्रवेश सोहळा उद्या सकाळी ११ वाजता, महाबळेश्वरमधील हॉटेल ईश्वर इन येथे मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पक्ष प्रवेश महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा. नामदार श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता असून उद्या सकाळी हॉटेल ईश्वर इन परिसरात मोठी गर्दी होण्याची दाट शक्यता आहे.
श्री सुभाष लक्ष्मण कारंडे यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) मध्ये दीर्घकाळ काम केले असून तालुक्यातील त्यांच्या मजबूत संघटनक्षमतेसाठी ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखालील शेकडो कार्यकर्ते उद्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणांना मोठी कलाटणी मिळणार आहे.
शिवसेना तालुकाप्रमुख श्री गणेश उतेकर म्हणाले,
“महाबळेश्वर तालुक्यात शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी उद्याचा पक्ष प्रवेश हा ऐतिहासिक ठरणार आहे. उपमुख्यमंत्री श्री. शिंदे साहेबांच्या उपस्थितीत होणारा हा कार्यक्रम तालुक्याच्या भविष्यातील राजकीय दिशेला नवी रूपरेषा देईल.”
तसेच त्यांनी तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक,युवा सेना,महिला आघाडी,सर्व शाखा प्रमुख,गट व विभाग प्रमुख,उपतालुका प्रमुख व सर्व पदाधिकारी यांना कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
आगामी महाबळेश्वर नगरपरिषद ,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जवळ येत आहेत. त्याआधीच राष्ट्रवादी (शरद पवार गट) मधील महत्त्वपूर्ण कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर होणारा पक्ष प्रवेश हा शिवसेनेसाठी मोठा राजकीय लाभ ठरणार आहे, असे स्पष्ट संकेत राजकीय वर्तुळात दिले जात आहेत.
कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल ईश्वर इन येथे सजावटीची कामे, बॅनर, पोस्टर्सची उभारणी सुरू असून शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. उद्या सकाळी मोठ्या संख्येने लोक जमून नवीन प्रवेशकांचे स्वागत करणार आहेत.
उद्या सकाळी ११ वाजता होणाऱ्या या भव्य प्रवेश सोहळ्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून महाबळेश्वरच्या राजकीय इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, अशी सर्वत्र चर्चा रंगली आहे.
Comments
Post a Comment