महिलेवर गैरवर्तन करून खुनाचा प्रयत्नमेढा पोलिस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेवर गैरवर्तन करून खुनाचा प्रयत्न
मेढा पोलिस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल
मेढा प्रतिनिधी :
मेढा (ता. जावळी) : तालुक्यातील एका गावात घडलेल्या धक्कादायक घटनेत एका महिलेशी गैरवर्तन करून तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मेढा पोलिस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे साडेसातच्या सुमारास घडली असून, गुन्हा ३ नोव्हेंबर रोजी पहाटे ३.५० वाजता दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित व्यक्ती हा पीडित महिलेच्या घरी गेला. त्या वेळी महिला घरात एकटी होती. त्याने घरात प्रवेश करून “डॉक्टर कोठे आहेत, ते कधी येणार आहेत?” अशी विचारणा केली. परंतु काही वेळातच त्याने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. महिलेने त्यास ठाम विरोध केला असता संशयित संतापला व “तुला जिवंत ठेवत नाही!” अशी धमकी देत धारदार शस्त्राने तिच्या गळ्यावर, कानावर, बगलेत आणि पाठीवर वार केले. या हल्ल्यात महिला गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पीडितेच्या दिराने मेढा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित संशयिताविरुद्ध गैरवर्तन, धमकी व खुनाचा प्रयत्न (कलम 354, 307 इ.अन्वये) गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर मेढा पोलिस ठाण्याचे एपीआय पाटील यांनी तात्काळ तपास सुरू केला असून, उपविभागीय पोलिस अधिकारी (डीवायएसपी) राजश्री तेरणी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. संशयिताच्या अटकेसाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, “सातारा जिल्ह्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे” अशी चर्चा स्थानिकांत सुरू आहे. ग्रामीण भागात एकाकी महिलांवर होत असलेले अत्याचार आणि वाढता गुन्हेगारी प्रवाह यावर प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
Comments
Post a Comment