सातारा–बामणोली मार्गावर भीषण अपघातएसटी बसला डंपरची धडक; २० प्रवासी जखमी
सातारा–बामणोली मार्गावर भीषण अपघात
एसटी बसला डंपरची धडक; २० प्रवासी जखमी
✍️ सूर्यकांत पवार,
कास प्रतिनिधी
सातारा–बामणोली मार्गावर आज संध्याकाळी चारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एसटी बसमधील २० प्रवासी जखमी झाले. तेटलीवरून साताऱ्याकडे निघालेल्या सातारा डेपोच्या एसटी बसला फळणी गावच्या हद्दीत, अंधारी–कासच्या मध्यभागी जंगलात असलेल्या एस-आकाराच्या धोकादायक वळणावर समोरून भरधाव वेगात येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. वाघाच्या पाणवठ्याजवळील या वळणावर झालेली ही धडक इतकी भीषण होती की बस जवळपास ७० ते ८० फूट मागे सरकली.
अपघाताची सविस्तर माहिती
सातारा डेपोची बस (क्रमांक MH 14 KQ 1394) दररोजप्रमाणे दुपारी बारा वाजता साताऱ्याहून तेटलीकडे निघाली होती. तेटली येथे पोहोचून ती दुपारी दोनच्या सुमारास परतीच्या प्रवासाला निघाली. अंधारी बसस्टॉपच्या वरच्या बाजूस असलेल्या अतिधोकादायक वळणावर साताऱ्याकडून येणारा डंपर (क्रमांक MH 11 BK 1888) भरधाव वेगात आला आणि एसटीला समोरासमोर धडक दिली.
या धडकेमुळे बसमधील ३२ पैकी २० प्रवासी गंभीर जखमी झाले. काहींचे हात मोडणे, ओठ फाटणे, चेहऱ्याला मार बसणे अशा स्वरूपाच्या खोल जखमा झाल्या. धडकेनंतर संपूर्ण बस रक्ताने माखली होती. बस आणखी काही फूट मागे गेली असती तर ती थेट दरीत कोसळून मोठी जीवितहानी झाली असती, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
स्थानिकांची धावपळ – जखमींना तत्काळ मदत
अपघातानंतर डंपर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला, तर क्लिनर जखमी अवस्थेत सापडला. स्थानिक ग्रामस्थांनी तत्परतेने धाव घेऊन जखमी प्रवाशांना बाहेर काढत बामणोली प्राथमिक आरोग्य केंद्र, सातारा जिल्हा रुग्णालय तसेच शहरातील काही खासगी दवाखान्यांत उपचारासाठी हलवले.
मेढा पोलीस स्टेशनचे हवालदार उदागे, बी. आर. नष्टे, कॉन्स्टेबल गुरव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत मेढा पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
डंपर चालकांची वाढती मुजोरी – नागरिकांचा रोष
सातारा–बामणोली तसेच मेढा–सह्याद्रीनगर–अंधारी या मार्गावर काही ठेकेदारांचे डंपर दिवसेंदिवस बेदरकारपणे, अतिवेगात धावत असल्याची तक्रार प्रवासी व नागरिकांकडून वारंवार केली जाते. डंपर चालकांकडून वाहतूक नियमांचा थोटाळा पाहायला मिळत असून सर्वसामान्यांच्या जीवाची कोणतीही पर्वा न करता ही वाहने धाववल्याने गंभीर अपघातांचे प्रमाण वाढत आहे.
नागरिकांनी या मार्गावर वाहतूक नियंत्रण, वेगमर्यादा, तसेच धोकादायक वळणांवर कठोर पावले उचलण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
फोटो – अंधारी गावच्या हद्दीत एसटी बस व डंपरची झालेली जोरदार धडक…
Comments
Post a Comment