गाव–शहर जोडणीद्वारे शाश्वत विकासाचा संकल्प; महाबळेश्वर–पुणेकर रहिवाशांची ३० नोव्हेंबरला महत्त्वपूर्ण चर्चा
गाव–शहर जोडणीद्वारे शाश्वत विकासाचा संकल्प; महाबळेश्वर–पुणेकर रहिवाशांची ३० नोव्हेंबरला महत्त्वपूर्ण चर्चा
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्यातील पुणेकर रहिवाशांनी ग्रामीण विकास, शेती, पर्यटन आणि स्थानिक उद्योगांच्या प्रगतीसाठी एकत्र येण्याचे आवाहन करत रविवार, ३० नोव्हेंबर रोजी पुण्यात महत्त्वपूर्ण चर्चासत्र आयोजित केले आहे. “एकच ध्यास – शाश्वत विकास” या घोषवाक्याने सजलेल्या या बैठकीत ग्रामीण भागाच्या भवितव्याचा पाया शहराशी मजबूत जोडणीवर आधारित असायला हवा, असा संदेश देत अनुभवी कार्यकर्ते संजय भाई मोर यांनी सर्व ग्रामस्थांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विविध क्षेत्रांत दीर्घकाळ काम करताना राजकारण, सहकार, समाजकारण, उद्योजकता आणि रोजगारनिर्मितीचा विशाल अनुभव घेतलेल्या संजय मोर यांनी गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागात अनेक प्रगतशील उपक्रम राबवले. मिरची, स्ट्रॉबेरी, नारळ, फणस, भेंडी यांसारख्या पिकांची बागायती लागवड, दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, रेशीम विकास, औषधी वनस्पती संकलन तसेच पर्यटन महोत्सव अशा विविध प्रयोगांमधून उत्पादनवाढ झाली असली तरी बाजारपेठेशी थेट जोडणी नसल्यामुळे योग्य दर मिळण्यात सातत्याने अडचणी जाणवत होत्या. मात्र पुणे मार्गाशी सुधारलेली नवीन वाहतूक व्यवस्था आणि खेड मार्गाच्या माध्यमातून साताऱ्याशी तयार होत असलेला जोड मार्ग यामुळे ग्रामीण उत्पादन थेट शहरात पोहोचवण्याचा मार्ग अखेर सुकर झाला आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी नवीन संधींचे दरवाजे खुलले असल्याचे मोर यांनी स्पष्ट केले आहे. ग्रामीण विकासासाठी गाव आणि शहर यांचे मजबूत कनेक्शन अनिवार्य असल्याचे सांगताना त्यांनी अलीकडील काही ठोस कामांचा उल्लेख केला. दूधगाव–मांघर रस्त्याला अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर नंबर मिळवून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनातून निधी उपलब्ध करून देण्यात आला. दाभे येथे शेतीसाठी आवश्यक पाणीसाठवण बंधाऱ्याचे काम सुरू आहे, तर वाडा–कुंभरोशी–पार दुधगाव–कळमगाव–कोट्रोशी या महत्त्वाच्या रस्त्याचा विस्तार करण्याचा संकल्पही हाती घेण्यात आला आहे. या सोबतच अनेक गावांमध्ये प्रचंड संधी असून त्या प्रत्यक्ष कामातून आणखी मोठ्या करता येऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेती, पर्यटन व ग्रामीण उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती, उत्पादनवाढ आणि शाश्वत विकास साधता येऊ शकतो. या सर्व प्रश्नांवर विस्तृत प्राथमिक चर्चा करण्यासाठी पुण्यातील माणिकबाग, सिंहगड रोड येथील अनुराबी हॉलमध्ये रविवार, ३० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. महाबळेश्वरकरांना आपली उपस्थिती नोंदवून ग्रामीण विकासाच्या दिशेने मजबूत पाऊल टाकण्याचे निमंत्रण संजय भाई मोर यांनी दिले आहे.
Comments
Post a Comment