महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल दुसऱ्यांदा; मतदान रद्द, प्रचार यंत्रणा ढवळून निघाली — चिन्हांचा प्रश्न अधिकच तीव्र
महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल दुसऱ्यांदा; मतदान रद्द, प्रचार यंत्रणा ढवळून निघाली — चिन्हांचा प्रश्न अधिकच तीव्र
✍️मिलिंद काळे,
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीत पुन्हा एकदा मोठा बदल झाला असून अगदी हाताच्या अंतरावर आलेल्या २ डिसेंबरच्या मतदानाचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. न्यायालयीन अपील प्रलंबित असणे आणि आयोगाच्या नियमावलीतील प्रक्रियागत अडचणी या चार महत्त्वाच्या मुद्द्यांमुळे हा निर्णय घेण्यात आला. परिणामी, एकाच निवडणुकीचा बिगुल या हंगामात दुसऱ्यांदा वाजला असून प्रशासन, उमेदवार आणि मतदार सर्वांमध्येच मोठी चर्चा सुरू झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाच्या २९ नोव्हेंबर २०२५ च्या पत्रानुसार सुधारित सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून नूतनीकरण केलेल्या कार्यक्रमाची अधिकृत घोषणा ४ डिसेंबरला होणार आहे. नामनिर्देशन मागे घेण्यासाठी १० डिसेंबरपर्यंत मुदत राहणार असून ११ डिसेंबर रोजी अंतिम उमेदवारी यादी आणि निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल. मतदान २० डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायं. ५.३० या वेळेत, तर मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. अंतिम निकाल २३ डिसेंबरपूर्वी राजपत्रात प्रसिद्ध होतील, अशी माहिती सचिव सुरेश काकाणी यांनी दिली.
दरम्यान, निवडणूक कार्यक्रमात झालेल्या अचानक बदलामुळे प्रचार यंत्रणा अक्षरशः ढवळून निघाली आहे. आतापर्यंत मिळालेली निवडणूक चिन्हे कायम राहणार की नवीन वाटप केले जाईल, याबाबत उमेदवारांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. आधीच्या चिन्हांच्या आधारे केलेले पत्रके, बॅनर्स, सेटिंग्ज आणि घराघरातील संवाद आता निष्प्रभ ठरण्याची शक्यता असल्याने उमेदवार चिंतेत आहेत. जर नवीन चिन्हे मिळाली तर प्रचार पुन्हा शून्यातून सुरू करावा लागेल, आणि त्याचा थेट परिणाम मतदारांच्या मनातील प्रतिमेवर होईल, अशी भीती उमेदवार व्यक्त करत आहेत.
निवडणुका पुढे ढकलल्यामुळे कोणाला राजकीय फायदा आणि कोणाला तोटा हेही आता चर्चेचे प्रमुख केंद्र बनले आहे. अनेकांना वेळ मिळाल्याने प्रचार अधिक मजबूत करता येईल, तर काही अपक्ष उमेदवारांच्या समोर तगडी आव्हाने उभी राहतील, अशीही शक्यता आहे. आतापर्यंत झालेला आर्थिक खर्च आणि आता पुन्हा नव्याने प्रचारासाठी करावा लागणारा खर्च यामुळे सर्वसामान्य उमेदवार अक्षरशः बेजार झाले आहेत. प्रचाराच्या मध्यावरच कार्यक्रमात बदल झाल्याने अनेकांनी घेतलेल्या कर्जाचा वा केलेल्या गुंतवणुकीचा भार आता दुप्पट होणार आहे.
थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर शहरातील राजकीय वातावरण मात्र या बदलांमुळे तापले आहे. उमेदवार-कार्यकर्त्यांचे तुकडे, सभा, रणनीती बैठका आणि व्हाट्सअॅपवरील चर्चांनी राजकीय वातावरणाला पूर्णपणे उकळत्या बिंदूपर्यंत नेले असून पुढील काही दिवसांत आणखी नाट्यमय घडामोडी होण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.
Comments
Post a Comment