कुष्ठरोग शोध मोहिमेत तपासणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा — जिल्हाधिकारी संतोष पाटील
कुष्ठरोग शोध मोहिमेत तपासणीसाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करा — जिल्हाधिकारी संतोष पाटील
✍️ सातारा प्रतिनिधी —
सातारा, दि. 10 : केंद्र शासनाने सन 2027 पर्यंत कुष्ठरोगाचा संसर्ग शून्यावर आणण्याचे लक्ष्य ठेवले असून, या उद्दिष्टपूर्तीसाठी राज्यात 17 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2025 या कालावधीत “कुष्ठरोग शोध मोहिम” राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान तपासणीसाठी घरोघरी भेट देणाऱ्या आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
कुष्ठरोग शोध मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) विभागाचे डॉ. राजेश गायकवाड, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संजय कुंभार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
या मोहिमेमार्फत ग्रामीण आणि शहरी भागातील लोकसंख्येची तपासणी करून कुष्ठरोगाचे संभाव्य रुग्ण लवकर शोधणे हा उद्देश आहे.
सहायक संचालक डॉ. राजेश गायकवाड यांनी सांगितले की,
“या मोहिमेत आशा कार्यकर्ती आणि पुरुष स्वयंसेवक यांच्या एकूण २ हजार ८६१ पथकांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील २५ लाख ४८ हजार ८५३ आणि शहरी भागातील १ लाख १९ हजार १३७ अशा एकूण २६ लाख ६० हजार ९९० लोकसंख्येची तपासणी करण्यात येईल.”
कुष्ठरोग हा संथ गतीने वाढणारा आजार असून सुरुवातीला त्याची लक्षणे सौम्य स्वरूपात दिसतात.
या संदर्भात जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले,
“हातापायाला मुंग्या येणे, हाता-पायातील ताकद कमी होणे, हातातून वस्तू गळणे, त्वचेवर फिकट पांढरे किंवा लालसर बधीर चट्टे दिसणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, त्वचेवर गाठी येणे अशी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी त्वरित तपासणी करून घ्यावी. प्रारंभीच्या अवस्थेत उपचार केल्यास हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो.”
कुष्ठरोगाबाबत समाजात अजूनही गैरसमज आणि भितीचे वातावरण असल्याने, नागरिकांनी या मोहिमेबाबत संवेदनशीलतेने वागून तपासणीसाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी पाटील यांनी नमूद केले.
तसेच, कुष्ठरोगग्रस्त व्यक्तींचे समाजात पुनर्वसन आणि भेदभावमुक्त जीवन हेही प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले.
“कुष्ठरोग शोध मोहिम 2025” ही केवळ आरोग्य तपासणी नव्हे, तर सामाजिक जागरूकतेची चळवळ आहे. नागरिकांचा सहकार्यपूर्ण प्रतिसादच “कुष्ठरोगमुक्त सातारा जिल्हा” या ध्येयाला गती देऊ शकेल.
Comments
Post a Comment