बोपर्डी ग्रामपंचायतीत समृद्ध पंचायत राज अभियानाची पाहणी — अधिकाऱ्यांचे काम कौतुकास्पद; गावकऱ्यांना गुणपत्रिका प्रमाणे सुधारणा करून साथ देण्याचे आवाहन
बोपर्डी ग्रामपंचायतीत समृद्ध पंचायत राज अभियानाची पाहणी — अधिकाऱ्यांचे काम कौतुकास्पद; गावकऱ्यांना गुणपत्रिका प्रमाणे सुधारणा करून साथ देण्याचे आवाहन
वाई प्रतिनिधी –
बोपर्डी : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत बोपर्डी ग्रामपंचायतीने आजपर्यंत केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल गावडे बुधवारी (दि. २६ नोव्हेंबर) बोपर्डीत दाखल झाले. ग्रामपंचायतीत भेट देऊन त्यांनी प्रत्यक्ष केलेल्या कामाचे मूल्यमापन केले आणि आता पुढील टप्प्यात कोणत्या बाबींमध्ये सुधारणा आवश्यक आहेत, हे बारकाईने तपासले. यावेळी समिती प्रमुख म्हणून श्री. राहुल गवडे यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे अधिकारी, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, समाजकल्याण अधिकारी तसेच महिला प्रतिनिधी उपस्थित होते. ग्रामपंचायतीत आगमन केल्यावर महिलांनी औक्षण करून पाहुण्यांचे स्वागत केले.
यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात वृक्ष देऊन स्वागत समारंभ पार पडला. कार्यक्रमा दरम्यान ग्रामपंचायत अधिकारी श्री. शंकर चिकटूळ यांनी प्रास्ताविक केले. सरपंच श्री. शंकर गाढवे (बापू) यांनी आजपर्यंत केलेल्या कामकाजाची आणि गावविकासाची सविस्तर माहिती सादर केली. ग्रामपंचायतीत चालणाऱ्या विविध उपक्रमांची, विशेषत: महिला बचतगटांसाठी सुरू असलेल्या व्यवसाय प्रशिक्षणाची आणि रोजगारक्षम उपक्रमांची माहितीही यावेळी देण्यात आली.
त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राहुल गावडे यांनी ग्रामपंचायतीच्या कामाचे कौतुक करताना गुणपत्रिका पद्धतीने गावाचा आढावा घेतला. ज्या ठिकाणी उत्तम गुण मिळाले आहेत त्या ठिकाणी गावकऱ्यांनी कायम सुधारणा टिकवून ठेवावी आणि ज्या ठिकाणी कमी गुण आहेत, तेथे सर्वांनी एकत्र येऊन सकारात्मक पावले उचलावीत, असे आवाहन त्यांनी केले. नागरिकांचा सहभाग, ग्रामपंचायतीशी समन्वय आणि आपल्या गावाच्या प्रगतीत स्वतःहून पुढाकार घेणे या गोष्टींवर त्यांनी विशेष भर दिला.
ग्रामपंचायत अधिकारी व ग्रामविकास कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करताना श्री. गावडे यांनी विशेषत: शासन निर्णयानुसार ठेवलेले अहवाल, दप्तर व त्यातील अभ्यास यांचे कौतुक केले. ग्रामविकासाच्या प्रक्रियेत अधिकारी आणि गावकऱ्यांनी घेतलेला सहभाग समाधानकारक असल्याचे त्यांनी नमूद केले. यासोबतच गावातील अनेक विभाग — अंगणवाडी, जिल्हा परिषद शाळा, आशा सेवा, सी.आर.पी., ग्रामसंघ अध्यक्ष, बचतगट व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी या अभियाना दरम्यान बजावलेली भूमिका उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
गावकऱ्यांनी स्वतःहून ग्रामपंचायतीसोबत समन्वय साधून काम करावे, एकमेकांना सहकार्य करावे आणि जिथे कमी गुण आहेत, तेथील कामे सुधारून पुढील पाहणीत बोपर्डीने उत्तम कामगिरी करावी, अशा अपेक्षा व्यक्त करत श्री. गवडे यांनी संपूर्ण समितीकडून या अभियानाला यश मिळवून देण्याचे आवाहन केले.
गावकरी, माजी पदाधिकारी आणि सरपंच श्री. शंकर गाडवे (बापू) यांनीही ग्रामपंचायतीतील कर्मचारी, अधिकारी आणि विभागीय पथकांच्या कामाचे कौतुक करून या अभियानासाठी आपला पूर्ण पाठिंबा दर्शविला. ग्रामपंचायतीने सर्व विभागांना एकत्र घेऊन केलेले काम कौतुकास्पद असून आगामी पाहणीत आणखी चांगले परिणाम मिळावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
Comments
Post a Comment