जिल्हा रुग्णालय, सातारा येथे कर्करोग तपासणी विभागाचा शुभारंभ — गोर-गरीब रुग्णांसाठी मोठा दिलासा
जिल्हा रुग्णालय, सातारा येथे कर्करोग तपासणी विभागाचा शुभारंभ — गोर-गरीब रुग्णांसाठी मोठा दिलासा
✍️सातारा प्रतिनिधी , दि. २१ –
सातारा जिल्ह्यातील कर्करोगग्रस्त व कर्करोग संशयित रुग्णांसाठी दिलासादायक ठरणारा उपक्रम जिल्हा रुग्णालय, सातारा येथे सुरू झाला आहे. कर्करोग तपासणी बाह्यरुग्ण विभागाचे (Cancer Screening OPD) उद्घाटन मा. याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा यांच्या हस्ते संपन्न झाले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांच्या पुढाकाराने व सातत्यपूर्ण पाठपुराव्याने हा महत्त्वाचा उपक्रम शक्य झाला.
या विभागाच्या सुरूवातीमुळे जिल्ह्यातील अनेक आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना कर्करोग तपासणीपासून ते उपचारांपर्यंत अत्यंत महत्त्वाची सुविधा आता जिल्हा रुग्णालयातच मिळणार आहे.
लवकर निदान = यशस्वी उपचार
कर्करोग हा आजार लवकर ओळखला तर मोठ्या प्रमाणावर उपचार शक्य होतात. त्यासाठी आवश्यक असलेली तपासणी साधने —
- एक्स-रे
- सोनोग्राफी
- CT Scan
- बायोप्सी
सर्व सुविधा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहेत.
याशिवाय कर्करोग तज्ज्ञ प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या गुरुवारी, सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत ३० नंबर ओपीडीमध्ये उपलब्ध राहणार आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मोफत किमोथेरपीची सुविधा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करण्यात आली आहे. या निर्णयाचा थेट फायदा जिल्ह्यातील शेकडो कर्करोगग्रस्त रुग्णांना होणार आहे.
कृष्णा हॉस्पिटल, कराडचा मोलाचा सहभाग
कर्करोग तपासणी विभाग उभारण्यात कृष्णा हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, कराड येथील कर्करोग विभाग प्रमुख डॉ. आनंद गुडूर यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. शुभारंभ कार्यक्रमास कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयाचे मेडिकल डायरेक्टर डॉ. कणसे, तसेच डॉ. आनंद गुडूर व त्यांची संपूर्ण टीम उपस्थित होती.
उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते—
- मा. याशनी नागराजन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सातारा
- डॉ. काळे, अधिष्ठाता, छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा
- डॉ. युवराज करपे, जिल्हा शल्यचिकित्सक
- डॉ. सुभाष कदम, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक
- डॉ. अरुंधती कदम
- डॉ. राहुल जाधव
- डॉ. चंद्रकांत काटकर
- डॉ. प्रमा गांधी
- डॉ. संजीवनी शिंदे
तसेच रुग्णालयातील सर्व कर्मचारी व एनसीडी विभागाच्या टीमने उपस्थिती लावली.
कर्करोग रुग्णांसाठी महत्वाचे आवाहन
या प्रसंगी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे यांनी जिल्ह्यातील सर्व कर्करोगग्रस्त रुग्णांना आवाहन केले की—
- जे रुग्ण किमोथेरपी घेत आहेत, त्यांनी आपले सर्व मेडिकल रिपोर्ट्स व किमोथेरपीची कागदपत्रे घेऊन जिल्हा रुग्णालयातील एनसीडी विभागाशी संपर्क साधावा.
- तर कर्करोग संशयित रुग्णांनी ३० नं. ओपीडीमध्ये उपलब्ध असलेल्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपले निदान करून घ्यावे.
जिल्ह्यातील गोर-गरीब रुग्णांसाठी ही सुविधा मोठा दिलासा देणारी ठरणार असून कर्करोगाविरुद्धच्या लढ्यात जिल्हा रुग्णालयाचा हा उपक्रम महत्वाची पायरी ठरेल.
Comments
Post a Comment