पेन्स फाऊंडेशनची सामाजिक बांधिलकी — कुंभरोशी शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप
पेन्स फाऊंडेशनची सामाजिक बांधिलकी — कुंभरोशी शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूलबॅगचे वाटप
जितेंद्र कारंडे,
प्रतापगड प्रतिनिधी :
प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेल्या महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम जिल्हा परिषद शाळा कुंभरोशी येथील विद्यार्थ्यांसाठी ‘पेन्स फाऊंडेशन, पालघर’ या सामाजिक संस्थेने एक प्रशंसनीय उपक्रम राबवला. संस्थेच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य स्कूलबॅगचे वाटप करण्यात आले.
कुंभरोशी शाळा ही दुर्गम भागात कार्यरत असूनही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच सर्वांगीण विकासासाठी अनेक उपक्रम राबवत आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांमध्ये मिळवलेल्या यशाची दखल घेऊन पेन्स फाऊंडेशनच्या सदस्यांनी प्रोत्साहनपर ही शैक्षणिक मदत दिली.
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनात प्रतापगड माची येथील हस्तकला केंद्राचे संचालक श्री. मुन्ना शेठ उतेकर यांचे विशेष सहकार्य लाभले. त्यांच्या माध्यमातून ही मदत शाळेपर्यंत पोहोचविण्यात आली.
कार्यक्रमास पारसोंड केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. विनायक पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री. निलेश रांजणे, तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजय सोंडकर आणि उपशिक्षक सचिन बोधणे उपस्थित होते.
शिक्षक व पालकांनी पेन्स फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे मनःपूर्वक कौतुक केले. अशा सामाजिक योगदानामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबद्दल अधिक प्रेरणा मिळते, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले.
कुंभरोशीसारख्या डोंगराळ भागातील शाळांपर्यंत अशी मदत पोहोचल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची गती अधिक वेगाने वाढेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Comments
Post a Comment