महाबळेश्वर : चिल्लरीतून अनामत रक्कम भरत अपक्ष उमेदवार संजय पाटील चर्चेतनगराध्यक्ष पदासाठी अनोख्या पद्धतीने उमेदवारी दाखल
महाबळेश्वर : चिल्लरीतून अनामत रक्कम भरत अपक्ष उमेदवार संजय पाटील चर्चेत
नगराध्यक्ष पदासाठी अनोख्या पद्धतीने उमेदवारी दाखल
महाबळेश्वर प्रतिनिधी,
दि. 16 नोव्हेंबर 2025 :
महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद निवडणुकीत आज एक आगळावेगळा प्रसंग पाहायला मिळाला. नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्यासाठी संजय गिरिधर पाटील हे आपल्या असंख्य समर्थकांसह नगरपरिषदेच्या कार्यालयात दाखल झाले. विशेष म्हणजे अनामत रक्कम भरण्यासाठी त्यांनी एक-एक रुपये, दोन-दोन रुपयांची चिल्लर घेऊन येत ही रक्कम जमा केली. चिल्लर मोजण्याच्या प्रक्रियेदरम्यान कार्यालयात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले.
संजय पाटील यांनी चिल्लर जमा करण्यामागील भावना स्पष्ट करताना सांगितले की,
“ही रक्कम माझ्या समर्थकांनी, सर्वसामान्यांनी दिलेली आहे. जनतेच्या पाठिंब्यावरच मी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उभा आहे. महाबळेश्वर नगरीचा भावी नगराध्यक्ष म्हणून जनता माझी निवड करेल असा मला पूर्ण विश्वास आहे.”
दूध व्यवसायातून सर्वसामान्यांच्या परिचयात आलेले पाटील
महाबळेश्वर शहरात दूध पुरवठा करणाऱ्या पाटील यांचा जनसंपर्क भक्कम आहे. अनेक वर्षे सर्वसामान्यांमध्ये राहून, त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांनी लोकांचा विश्वास संपादन केला आहे. कोणत्याही राजकीय पक्षाचा आधार न घेता अपक्ष उमेदवारी दाखल करून त्यांनी निवडणूक रिंगणात दमदार पाऊल टाकले आहे.
नामनिर्देशनाच्या वेळी पाटील यांनी दाखल केलेल्या अर्जासोबत मोठ्या संख्येने समर्थक उपस्थित होते. चिल्लर जमा करण्याच्या या अनोख्या कृतीमुळे वातावरणात उत्साह जाणवत होता. अनेकांनी ही प्रक्रिया मोबाईलमध्ये टिपत सोशल मीडियावर अपलोड केली असून, शहरात या घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे.
निवडणुकीच्या वातावरणात नवीन रंग
महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीत आधीच चुरस वाढलेली असताना अपक्ष उमेदवार संजय पाटील यांनी भरलेली चिल्लरीची अनामत रक्कम हा प्रचारातील नवा ठसा मानला जात आहे. सर्वसामान्यांचा पाठिंबा दाखवण्याची त्यांची ही पद्धत मतदारांमध्ये पोचत असून, आगामी दिवसांत त्यांच्या उमेदवारीला नेमका किती प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
Comments
Post a Comment