मतदार याद्यांतील दुबार नावे तपासून कार्यवाहीसाठी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांचे निर्देश
मतदार याद्यांतील दुबार नावे तपासून कार्यवाहीसाठी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांचे निर्देश
मतदारांची अचूक नोंदणी सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन सज्ज
सातारा, प्रतिनिधी :
राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वापरण्यात येणाऱ्या मतदार याद्यांमधील दुबार नावे शोधून त्यावर आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या संदर्भात सातारा जिल्ह्यातील सर्व संबंधित विभागांना उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांनी सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने २९ ऑक्टोबर २०२५ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरल्या जाणाऱ्या मतदार याद्यांमध्ये काही मतदारांची नावे दोन किंवा अधिक वेळा नोंद झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ तपासणी करून योग्य कार्यवाही करणे बंधनकारक आहे.
भारतीय संविधानातील कलम २४३ (के) व २४३ (झेडए) तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमानुसार राज्य निवडणूक आयोगास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याचे व त्यावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विधानसभेची अस्तित्वात असलेली मतदार यादी जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती गणात विभागून वापरली जाते. तथापि, या प्रक्रियेत नवीन नावे समाविष्ट करणे किंवा मूळ यादीतील नावे वगळणे, दुरुस्ती करणे यासारख्या अधिकार आयोगाकडे अथवा अधिकाऱ्यांकडे नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व निवडणूक विभागांना ऑनलाइन प्रणालीद्वारे ‘दुबार रिपोर्ट’ हा विशेष सबमेन्यू उपलब्ध करून देण्यात आला आहे. संबंधित अधिकारी या माध्यमातून त्यांच्या विभागातील मतदार यादीतील संभाव्य दुबार नावे तपासू शकतात. याद्यांमध्ये अशा मतदारांच्या नावासमोर “(**)” हे चिन्ह दिलेले असून, नाव, लिंग, पत्ता आणि छायाचित्र यांची पडताळणी करून ती नावे प्रत्यक्षात एकाच व्यक्तीची आहेत का याची खात्री करणे आवश्यक आहे.
जर एकाच व्यक्तीचे नाव दोन किंवा अधिक ठिकाणी असल्याचे स्पष्ट झाले, तर त्या मतदाराकडून परिशिष्ट एक नमुन्यातील अर्ज घेऊन तो नेमका कोणत्या प्रभागातील किंवा गणातील मतदान केंद्रावर मतदान करणार आहे हे निश्चित केले जाईल. त्यानंतर अधिकृत खात्री झाल्यानंतर त्याच्या निवडलेल्या मतदान केंद्रातच मतदानाचा अधिकार दिला जाईल.
मतदाराने जर निवडलेल्या केंद्राबाबत प्रतिसाद दिला नाही, तर अशा मतदाराच्या नावासमोर “दुबार मतदार” अशी नोंद घेण्यात येईल. तथापि, तो मतदानासाठी आल्यास त्याच्याकडून इतर ठिकाणी मतदान केले नसल्याचे हमीपत्र (परिशिष्ट दोन) लिहून घेण्यात येईल. हे हमीपत्र संबंधित चिन्हांकित मतदार यादीसाठी असलेल्या लिफाफ्यात सुरक्षित ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांनी स्पष्ट केले की, “मतदार याद्यांतील पारदर्शकता आणि शुद्धता राखणे हे प्रशासनाचे प्रमुख कर्तव्य आहे. दुबार नावे व त्रुटी दूर करून आगामी निवडणुका निर्विघ्न आणि निष्पक्ष पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी तत्परतेने कार्य करावे.”
या सूचनांमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पारदर्शक आणि अचूक मतदार याद्यांवर आधारित पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
Comments
Post a Comment