बेल्जियम विद्यार्थ्यांचा दरे गावाला सांस्कृतिक अभ्यास दौरा — ग्रामीण जीवनशैलीचा घेतला जवळून अनुभव
बेल्जियम विद्यार्थ्यांचा दरे गावाला सांस्कृतिक अभ्यास दौरा — ग्रामीण जीवनशैलीचा घेतला जवळून अनुभव
जितेंद्र कारंडे,
प्रतापगड प्रतिनिधी–
भारतीय ग्रामीण संस्कृती, शेती पद्धती आणि पारंपरिक जीवनशैली जाणून घेण्यासाठी बेल्जियम देशातील विद्यार्थ्यांच्या पथकाने अलीकडेच महाबळेश्वर तालुक्यातील दरे गावाला भेट दिली. हा दौरा St. Xavier School, Panchgani यांच्या माध्यमातून Cultural Exchange (सांस्कृतिक देवाणघेवाण) कार्यक्रमांतर्गत आयोजित करण्यात आला होता.
या अभ्यासदौऱ्यासाठी बेल्जियममधील २६ विद्यार्थी व ४ शिक्षक सहभागी झाले होते. त्यांच्या सोबत St. Xavier School, Panchgani शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षकही उपस्थित होते. या भेटीचा उद्देश भारतीय ग्रामीण भागातील जीवनमान, संस्कृती, शेती पद्धती आणि स्वावलंबी जीवनशैलीचा अभ्यास करणे हा होता.
विद्यार्थ्यांच्या आगमनानंतर दरे गावातील सरपंच श्री. गणपत मोरे, पोलिस पाटील श्री. नामदेव गायकवाड, शिक्षकवृंद, आरोग्यसेवक आणि ग्रामस्थांनी पारंपरिक पद्धतीने त्यांचे स्वागत केले. ढोल-ताशांच्या गजरात आणि लेझीम नृत्याच्या सादरीकरणाने वातावरण दणाणून गेले. गावातील महिलांनी आरती करून पाहुण्यांचे स्वागत केले.
यानंतर विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. स्वागत समारंभानंतर विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनशैलीचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी त्यांना गावातील काही घरांमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांनी भाकर बनवण्याची पारंपरिक प्रक्रिया पाहिली, तसेच काही विद्यार्थ्यांनी स्वतः भाकर थापण्याचाही प्रयत्न केला. St. Xavier School चे विद्यार्थी translator म्हणून बेल्जियम विद्यार्थ्यांना भाषांतर करून मदत करत होते.
गावातील महिलांनी ताक बनवण्याचे प्रात्यक्षिक दाखवले, तर ग्रामीण उद्योजकतेचा भाग म्हणून मधमाशी पालनाचे (Bee Keeping) प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. त्याचबरोबर नदीकिनारी खेकडे पकडण्याचे पारंपरिक कौशल्यही विद्यार्थ्यांनी उत्सुकतेने पाहिले.
या अभ्यासदौऱ्यामुळे बेल्जियममधील विद्यार्थ्यांना भारतीय ग्रामीण जीवन, शेती, पारंपरिक अन्नपदार्थांची निर्मिती आणि समाजातील एकोप्याचे मूल्य जाणून घेण्याची संधी मिळाली. त्यांनी गावकऱ्यांच्या आत्मीय स्वागताचे कौतुक करत भारतीय लोकजीवनाबद्दल समाधान व्यक्त केले.
या उपक्रमामुळे दरे गावाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले आहे. गावातील नागरिक, शाळेचे शिक्षक आणि विद्यार्थी यांचा सहभाग पाहून सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
— दरे ग्रामस्थांचा अभिमान वाढविणारा उपक्रम
Comments
Post a Comment