महाबळेश्वरमध्ये रंगभूमी दिनाचा उत्साह — नाट्य शिवप्रतिष्ठानच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व नवोदित कलाकारांना लाभले अभिनयाचे मार्गदर्शन
महाबळेश्वरमध्ये रंगभूमी दिनाचा उत्साह — नाट्य शिवप्रतिष्ठानच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व नवोदित कलाकारांना लाभले अभिनयाचे मार्गदर्शन
राजेश सोंडकर,
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर : निसर्गरम्य आणि सांस्कृतिक परंपरेने नटलेल्या महाबळेश्वरमध्ये जागतिक रंगभूमी दिनाचे औचित्य साधून तालुक्यातील सर्वात जुनी आणि नोंदणीकृत सांस्कृतिक संस्था ‘नाट्य शिवप्रतिष्ठान’ यांच्या वतीने रंगभूमी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांसाठी तसेच हौशी कलाकारांसाठी अभिनय कार्यशाळा, चर्चासत्र आणि रंगकला प्रदर्शन यांचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले मराठी रंगभूमी आणि दूरदर्शन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री माधुरी सोमण, सहायक दिग्दर्शक ऋग्वेद सोमण आणि कथ्थक नृत्यांगना अन्विता वैद्य यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन. त्यांनी अभिनय, पात्र निवड, संवाद सादरीकरण आणि हावभाव या अभिनयशैलीतील महत्त्वाच्या अंगांवर सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व नटराजपूजनाने झाली. यावेळी अ. भा. नाट्य परिषदेचे महाबळेश्वर शाखाध्यक्ष व माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, नाट्य शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष किसनराव खामकर, माजी नगराध्यक्ष प्रभाकर देवकर, ज्येष्ठ पत्रकार संजय दस्तुरे, रविंद्र कुंभारदरे, विलास काळे, तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर रतिकांत तोषणीवाल, दिलिप शिपटे, शिरीष गांधी, वृषाली डोईफोडे, रोहिणी वैद्य, लिलाताई शिंदे, राणी शिंगरे आणि प्रतिष्ठानचे कार्यकर्ते नितीन चौरसिया, श्रीकांत जाधव, रणजित तांबे, संतोष पवार, अरुण शिंगरे, रवि संकपाळ, दीपक बावळेकर, अजय आखाडे, दिनेश भिसे, शाम जेधे आदी उपस्थित होते.
कार्यशाळेदरम्यान कलाकारांनी नाट्यकलेचा आत्मा म्हणजे “पात्रात स्वतःला विसर्जित करण्याची कला” यावर भर दिला. उपस्थित विद्यार्थ्यांना आणि कलाकारांना प्रत्यक्ष अभिनयप्रयोग दाखवून ‘संवादातील भाव’, ‘हावभावातील ताकद’ आणि ‘रंगमंचावर प्रेक्षकांशी संवाद साधण्याचे कौशल्य’ यांचा अनुभव देण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांनी अभिनयातील सूक्ष्म बारकावे जाणून घेत आत्मविश्वास वाढवला.
या कार्यक्रमाचे समारोप सत्रात नाट्य शिवप्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष तथा अ. भा. नाट्य परिषद नियामक मंडळाचे सदस्य राजेश कुंभारदरे म्हणाले,
“रंगभूमी ही केवळ तालिम किंवा सादरीकरण नाही, तर समाजाला विचार करायला लावणारी, सजग करणारी आणि संस्कार देणारी कला आहे. नाट्य शिवप्रतिष्ठान सारख्या संस्थांच्या माध्यमातून नविन पिढीने आपल्या कलागुणांना वाव द्यावा आणि महाबळेश्वरचे नाव राज्यभर उज्ज्वल करावे.”
सकाळपासून दुपारपर्यंत चाललेल्या या रंगभूमी दिनाच्या उत्सवात कला, अभिनय आणि संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळाला. नवोदित कलाकारांनी रंगभूमीविषयी आपली ओढ आणि जिद्द व्यक्त केली, तर प्रसिद्ध कलाकारांच्या मार्गदर्शनामुळे या पिढीला नवीन दिशा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
कार्यक्रमानंतर सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली. नाट्य शिवप्रतिष्ठानच्या वतीने पुढील महिन्यात “हौशी नाट्य स्पर्धा” घेण्याची घोषणा करण्यात आली असून, या उपक्रमातून ग्रामीण भागातील नाट्यकलेला चालना मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
Comments
Post a Comment