डिजीटल बुचकेवाडी” ने तालुक्याचा लौकिक वाढवावा – प्राचार्य विजय जाधव

“डिजीटल बुचकेवाडी” ने तालुक्याचा लौकिक वाढवावा – प्राचार्य विजय जाधव
लोकसहभागातून आदर्श ग्रामविकासाचे नवे पर्व; कर वसुलीसाठी क्यूआर कोड प्रणालीचा शुभारंभ

जुन्नर – प्रतिनिधी

लोकसहभागाच्या बळावर सर्वांगीण ग्रामविकास साध्य करत पुरस्कारांची मालिका गाठलेल्या बुचकेवाडी ग्रामपंचायतीने आता डिजीटल क्रांतीचा नवा अध्याय सुरू केला आहे. ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता व कार्यक्षमतेसाठी कर वसुली प्रणाली डिजीटल करण्यात आली असून प्रत्येक घराच्या दर्शनी भागावर क्यूआर कोड नेम प्लेट लावण्यात आली आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना थेट मोबाईलद्वारे कर भरण्याची सुविधा मिळाली असून गावाला “डिजीटल बुचकेवाडी” अशी नवी ओळख लाभली आहे.

शनिवार, दि. १ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता संपन्न झालेल्या ग्रामसभेत या क्यूआर कोड नेम प्लेटचे वितरण लोकनियुक्त सरपंच श्रीमती शिल्पा बुचके यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या वेळी पंचायत राज प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजय जाधव, माजी सरपंच सुदामशेठ डेरे, सावलेराम गवारी, ग्रामपंचायत सदस्य सचिन पवार, योगेश बुचके, अक्षदा केदार, गणेश गवारी, ग्रामसेवक प्रदीप खिलारी, तसेच धनंजय डोके, देविदास पवार, अरुण डेरे, गणेश पवार, गोरक्ष बुचके, आणि ॲड. गणेश डेरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी ग्रामपंचायतीच्या डिजिटल उपक्रमाचे संक्षिप्त सादरीकरण करण्यात आले. प्राचार्य विजय जाधव यांनी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत असलेल्या १०० गुणांकन निकषांची सविस्तर माहिती दिली. गावातील प्रत्येक घटक विषयात उत्कृष्ट कामगिरी करून सर्वोच्च स्थान मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी सजग प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. “बुचकेवाडीने आतापर्यंत जलसंधारण, पर्यावरण संवर्धन, कृषी विकास, स्वच्छता आणि आदर्श ग्रामपंचायत या क्षेत्रांमध्ये तब्बल ३० हून अधिक पुरस्कार पटकावले आहेत. आता डिजीटल माध्यमातून गाव प्रशासनात पारदर्शकता आणून बुचकेवाडीने पुन्हा एकदा तालुक्याचा लौकिक वाढवावा,” असे ते म्हणाले.

शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी वसलेली बुचकेवाडी ही ग्रामविकासात नावारूपास आलेली आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. ग्रामस्थांच्या सहकार्याने साकार झालेल्या जलसंधारण प्रकल्पांपासून ते हरित उपक्रमांपर्यंत अनेक योजनांमुळे या गावाने राज्यस्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. आता डिजीटल व्यवस्थापनाच्या माध्यमातून गावाची ही वाटचाल आधुनिकतेकडे वेगाने होत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक प्रदीप खिलारी यांनी मानले.
या उपक्रमामुळे गावातील करदात्यांना सुलभ सेवा मिळणार असून डिजीटल भारत, समृद्ध ग्रामपंचायत या संकल्पनेला मूर्त रूप मिळणार आहे.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl