मधाचे गाव’ मांघर येथे मधपाळांना सातेरी मधपेट्यांचे वितरण : ग्रामोद्योग मंडळाच्या उपक्रमातून मध व्यवसायाला नवे बळ
‘मधाचे गाव’ मांघर येथे मधपाळांना सातेरी मधपेट्यांचे वितरण : ग्रामोद्योग मंडळाच्या उपक्रमातून मध व्यवसायाला नवे बळ
✍️ विलास काळे,
महाबळेश्वर प्रतिनिधी —
महाबळेश्वर तालुक्यातील ‘मधाचे गाव’ म्हणून ओळख असलेल्या मांघर येथे मधपाळांच्या व्यवसायवृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि मध संचालनालय (महाबळेश्वर) यांच्या वतीने एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात गावातील ७१ मधपाळांना प्रत्येकी ३ अशा एकूण २१३ ‘सातेरी’ सागवानी मधपेट्यांचे वाटप करण्यात आले.
मंडळाचे सभापती रवींद्र साठे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते या मधपेट्यांचे वितरण झाले. यावेळी मधपेट्यांवरील निर्जंतुकीकरण माहिती पत्रक आणि नामफलकाचे अनावरणही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या उपक्रमासाठी ‘आरती ड्रग्ज लि. तारापूर’ आणि ‘स्किलनेट सोल्युशन्स इंडिया प्रा. लि. मुंबई’ या दोन संस्थांनी त्यांच्या व्यावसायिक सामाजिक उत्तरदायित्व (CSR) निधीतून अर्थसहाय्य उपलब्ध करून दिले. कार्यक्रमादरम्यान या संस्थांच्या प्रतिनिधींनी मधपाळांना मार्गदर्शन केले आणि मध उद्योगातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर मध उद्योगातील प्रगती व ग्रामीण अर्थव्यवस्थेतील त्याच्या योगदानावर विचारमंथन करण्यात आले.
सभापती रवींद्र साठे यांनी मधपाळांना प्रेरित करताना सांगितले की,
“मांघर येथील मधपाळांनी या संधीचा योग्य फायदा घेऊन मधाचा व्यवसाय वाढवावा. सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उत्पादन वाढविण्यावर भर दिल्यास ग्रामविकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल.”
मुख्य कार्यकारी अधिकारी गीतांजली बाविस्कर यांनी मंडळाची भूमिका स्पष्ट करताना सांगितले,
“मध उद्योग व्यवसायाच्या वृद्धीसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ सदैव मधपाळांच्या पाठीशी आहे. वाटप केलेल्या पेट्यांमधील वसाहती यशस्वीपणे विकसित करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करा.”
🐝 कार्यक्रमातील मान्यवरांची उपस्थिती
कार्यक्रमास रवींद्र ठाकरे (सह मुख्य कार्यकारी अधिकारी, मंडळ), प्रकाश पाटील (अध्यक्ष, आरती ड्रग्ज लि. तारापूर), नित्यानंद पाटील (उपमुख्य कार्यकारी अधिकारी – उद्योग), रघुनाथ नारायणकर (संचालक, मध संचालनालय, महाबळेश्वर), तसेच निसार तांबोळी (जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, सातारा) आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रघुनाथ नारायणकर यांनी केले, स्वागत व आभारप्रदर्शन गणेश जाधव (सरपंच, मांघर) यांनी केले, तर सुत्रसंचालन सुनील पार्टे (सहाय्यक गट विकास अधिकारी) यांनी केले.
मधपाळ महादेव जाधव यांनी ‘आरती ड्रग्ज’ व ‘स्किलनेट सोल्युशन्स’ या संस्थांचे विशेष आभार मानले.
🌾 ग्रामविकासाच्या दिशेने ‘मधग्राम’ची वाटचाल
या उपक्रमामुळे मांघर येथील मधपाळांना उत्पादनवाढीची नवी संधी मिळाली आहे. स्थानिक स्तरावर मध प्रक्रिया, पॅकिंग आणि विपणनाच्या नव्या शक्यता निर्माण होत आहेत. ‘मधाचे गाव’ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या मांघरने आता खऱ्या अर्थाने ग्रामोद्योगातील आदर्श मॉडेल म्हणून आपली ओळख निर्माण करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
Comments
Post a Comment