महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद निवडणूक 2025नामनिर्देशन छाननी पूर्ण; मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात – पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त नाही
महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद निवडणूक 2025
नामनिर्देशन छाननी पूर्ण; मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात – पहिल्या दिवशी एकही अर्ज प्राप्त नाही
✍️मिलिंद काळे,
महाबळेश्वर प्रतिनिधी –
महाबळेश्वर – महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या नामनिर्देशन प्रक्रियेतील महत्त्वाचा टप्पा म्हणून 18 नोव्हेंबर 2025 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी पूर्ण झाली. छाननीनंतर वैध नामनिर्देशन पत्रांची यादी नमुना 4-अ नुसार नगरपरिषद कार्यालयातील नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
यानंतर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या प्रक्रियेला आज 19 नोव्हेंबरपासून औपचारिक सुरुवात झाली आहे. नामनिर्देशन अर्ज मागे घेण्यासाठी महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद कार्यालय हे अधिकृत ठिकाण म्हणून निश्चित करण्यात आले आहे.
नामनिर्देशन मागे घेण्याचा कालावधी
अपील नसल्यास:
19 नोव्हेंबर 2025 ते 21 नोव्हेंबर 2025, दुपारी 3.00 वाजेपर्यंत उमेदवार नामनिर्देशन मागे घेऊ शकतील.
छाननीतील निकालाविरोधात अपील असल्यास:
सदर अपील जिल्हा न्यायाधीशांकडे वैधरित्या नामनिर्देशित यादी प्रसिद्ध झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत दाखल करता येईल.
अशा परिस्थितीत नामनिर्देशन मागे घेण्याचा कालावधी 21 नोव्हेंबर 2025 ते 25 नोव्हेंबर 2025 असा राहील.
अपीलाचा निर्णय ज्या दिवशी जाहीर होईल, त्या तारखेच्या तिसऱ्या दिवशीपर्यंत नामनिर्देशन मागे घेणे शक्य आहे, मात्र अंतिम मर्यादा 25 नोव्हेंबर 2025 आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना अपील प्रक्रिया जलदगतीने पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्नशील राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
पहिल्या दिवशी मागे घेण्यासाठी शून्य अर्ज
आज दिनांक 19 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 या वेळेत नामनिर्देशन मागे घेण्यासाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही, अशी अधिकृत माहिती देण्यात आली.
महाबळेश्वर नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारांची संख्यात्मक स्पर्धा लक्षात घेता आगामी दोन-तीन दिवसांत नामनिर्देशन मागे घेण्याच्या प्रक्रियेत काही महत्त्वाच्या हालचाली होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment