महाबळेश्वर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 : तिसऱ्या दिवशीही अर्ज दाखल नाही; राजकीय समीकरणांमुळे शांतता की रणनीतीचा भाग?
महाबळेश्वर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 : तिसऱ्या दिवशीही अर्ज दाखल नाही; राजकीय समीकरणांमुळे शांतता की रणनीतीचा भाग?
✍️ जितेंद्र करंडे,
प्रतापगड प्रतिनिधी
महाबळेश्वर, दि. 12 नोव्हेंबर 2025 –
महाबळेश्वर गिरीस्थान नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 साठी आज अर्ज दाखल करण्याचा तिसरा दिवस असूनही, एकही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केलेले नाही. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आज दिवसभर शांतता पाहायला मिळाली. या शांततेमागे मात्र तीव्र राजकीय हालचाली आणि पडद्यामागील रणनीतीचे वारे जोरात वाहत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शहरात आणि सोशल मीडियावर निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांची बैठकीची मालिका अखंड सुरू असून, रात्री उशिरापर्यंत पक्षांतर्गत चर्चेचे फेरे सुरू आहेत. "रात्रीस खेळ चाले" अशा स्वरूपाचे संदेश शहरभर फिरत आहेत.
कालपर्यंत नगराध्यक्ष पदासाठी चार प्रमुख इच्छुकांची नावे चर्चेत होती —
🔹 कुमार शिंदे
🔹 सुनील शिंदे
🔹 डी. एम. बावळेकर
🔹 नासिर मुलाणी
मात्र, काल रात्रीपासून शहरात एक नवीन नाव जोरात चर्चेत आले आहे — ‘आबा शिंदे’. नागरिकांच्या सोशल मीडियावरील स्टेटसवर आणि चर्चांमध्ये "आबा शिंदे नगरसेवक होणार की नगराध्यक्ष ?" या प्रश्नाने रंग चढवला आहे.
राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, सध्या सर्व पक्ष पडद्यामागे गठबंधन, उमेदवारांची अदलाबदल, आणि अंतर्गत मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करत आहेत. अनेक संभाव्य उमेदवारांनी "योग्य वेळ" पाहूनच अर्ज दाखल करण्याची रणनीती आखल्याचे समजते.
राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार,
- काही उमेदवार अजूनही पक्षश्रेष्ठींशी अंतिम चर्चेत आहेत,
- काहींनी प्रभागांमधील मतदारसंघांमध्ये जातीय आणि गटबाजीचे गणित मांडले आहे,
- तर काहींनी "सामाईक उमेदवार" देण्याच्या पर्यायावर विचार सुरू केला आहे.
महाबळेश्वरसारख्या संवेदनशील आणि छोट्या नगरपरिषदेतील निवडणूक म्हणजे संबंध, मतदारसंघातील प्रभाव, आणि पक्षनिष्ठा या तिन्हींचा कस असतो. त्यामुळे इच्छुक उमेदवार आता सावध पवित्रा घेत असल्याचे स्पष्ट दिसते.
उद्या चौथा दिवस असून, अर्ज दाखल करण्याच्या तारखेत आता फारसा वेळ शिल्लक नाही. तरीसुद्धा, ‘निवडणुकीच्या रणांगणात कोण पहिले पाऊल टाकणार?’ हा प्रश्न नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण करतो आहे.
दरम्यान, महाबळेश्वरातील स्थानिक राजकारणात दररोज नवे वळण घेत असल्याने पुढील काही दिवसांत नाट्यमय घडामोडी घडण्याची चिन्हे आहेत.
📍महाबळेश्वरातील नागरिक मात्र निवडणुकीच्या या ‘शांत’ वातावरणात पडद्यामागील हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.
Comments
Post a Comment