सातारा जिल्ह्यात वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापनदिनानिमित्त उत्साहात सामूहिक गायन
सातारा जिल्ह्यात वंदे मातरम गीताच्या 150 व्या वर्धापनदिनानिमित्त उत्साहात सामूहिक गायन
✍️ सातारा प्रतिनिधी –
सातारा, दि. ७ : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या ‘वंदे मातरम’ या गीताला आज १५० वर्षे पूर्ण झाली. स्वातंत्र्य संग्रामात भारतीय जनतेत देशभक्तीची ज्वाला पेटवणारे हे गीत आजही प्रत्येक भारतीयाच्या अंतःकरणात जागृत आहे. या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आज संपूर्ण सातारा जिल्ह्यात ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन अत्यंत उत्साहात पार पडले.
जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, सर्व तहसील कार्यालये, नगरपालिका, महाविद्यालये, शाळा, औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच पोलीस ठाण्यांमध्ये हा उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आला. हजारो विद्यार्थी, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, नागरिक आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांनी देशभक्तीच्या ओढीने सहभाग घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या मुख्य कार्यक्रमास जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत ‘वंदे मातरम’ गीताचे गायन करण्यात आले. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत चव्हाण यांच्यासह अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पाटील यांनी वंदे मातरम या गीताचे राष्ट्रीय स्वातंत्र्य संग्रामातील योगदान अधोरेखित करत देशभक्ती आणि एकात्मतेचा संदेश दिला.
पोलीस विभागाचा सहभाग
सातारा पोलीस मुख्यालयासह जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यक्रमात अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक अतुल सबनीस, अधिकारी व अंमलदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांमध्ये प्रतिष्ठित नागरिक, पोलीस पाटील, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांचे सदस्य सहभागी झाले.
तालुका स्तरावरील कार्यक्रम
-
महाबळेश्वर:
महाबळेश्वर नगरपरिषदेच्या कार्यालयात आणि शासकीय कार्यालयांमध्ये ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. तहसीलदार सचिन मस्के,मुख्याधिकारी योगेश पाटील, अधिकारी व कर्मचारी यांच्यासह नागरिकांनी देशभक्तीने भारलेल्या वातावरणात सहभाग घेतला. स्थानिक शाळा-महाविद्यालयांमध्येही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर घोषणांनी वातावरण भारून टाकले. -
दहिवडी (माण):
प्रांताधिकारी उज्वला गाडेकर यांच्या उपस्थितीत शासकीय अधिकारी, शालेय विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्साहात गायन केले. -
वाई:
प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या संख्येने नागरिक, अधिकारी आणि विद्यार्थी सहभागी झाले. -
लोणंद (खंडाळा):
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांनी देशभक्तीचा उत्साह अनुभवत ‘वंदे मातरम’ गीताचे गायन केले.
वंदे मातरम या गीताने भारतीय जनतेच्या मनामनात देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि आत्मगौरवाची भावना जागवली आहे. या गीताच्या १५० व्या वर्धापनदिनानिमित्त वर्षभर चार टप्प्यांत विविध सांस्कृतिक, शैक्षणिक आणि देशभक्तीपर उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.
या निमित्ताने संपूर्ण सातारा जिल्हा देशभक्तीच्या भावनेने भारून गेला — “वंदे मातरम”चा जयघोष महाबळेश्वरपासून साताऱ्यापर्यंत दुमदुमला. 🇮🇳
Comments
Post a Comment