ऐतिहासिक प्रतापगड जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित — 127 कोटींच्या निधीसह सर्वांगीण विकासाला सुरुवात
🚩 ऐतिहासिक प्रतापगड जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित — 127 कोटींच्या निधीसह सर्वांगीण विकासाला सुरुवात 🚩
✍️ जितेंद्र कारंडे,
प्रतापगड प्रतिनिधी –
महाबळेश्वर तालुक्याचा अभिमान असलेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षीदार असलेला ऐतिहासिक प्रतापगड किल्ला आता अधिकृतपणे जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रतापगड किल्ल्याच्या जतन, संवर्धन आणि सर्वांगीण विकासासाठी प्रतापगड किल्ला प्राधिकरण स्थापन करण्यात आले असून, या प्राधिकरणाची पहिली बैठक आज यशस्वीपणे पार पडली.
या प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, तर सह-अध्यक्ष पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत. बैठकीत प्रतापगडच्या जतनासाठी ₹127 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून, या रकमेतून विविध संवर्धन व विकासकामांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
🔸 प्राधिकरणाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय
बैठकीत प्रतापगड प्राधिकरणाचे बँक खाते उघडणे, निधी मागणी प्रक्रिया, प्राधिकरणाकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन करणे, तसेच प्रतापगड किल्ला (भाग-५) आणि (भाग-६) अंतर्गत जतन, संवर्धन कामांसाठी निविदा आणि अंदाजपत्रकास मान्यता देण्यात आली.
यासोबतच —
- प्रकल्प सल्लागार नियुक्ती व मानधन शुल्कास मान्यता,
- लाईट अँड साऊंड शो स्क्रिप्टला मान्यता,
- आकस्मिक खर्चासाठी सुधारीत शासन निर्णय,
- छत्रपती शिवाजी महाराजांच्या भित्तीचित्रास मान्यता,
- किल्ल्यावरील आराखड्यांचे तपासणी व मंजुरी,
- सार्वजनिक बांधकाम विभागाकडील विश्रामगृह प्राधिकरणाकडे वर्ग करणे,
- प्रतापगड पायथ्याशी वाहनतळ निश्चित करणे आणि विद्युत बस / ई-बस सेवा कार्यान्वित करणे,
अशा विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली.
🔸 “प्रतापगड संवर्धनासाठी देवस्थानची जागाही देऊ” – श्रीमंत उदयनराजे भोसले
बैठकीनंतर बोलताना अध्यक्ष श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले,
“प्रतापगड किल्ल्याच्या संवर्धन, जनत आणि विकासासाठी जे प्रकल्प राबविण्यात येत आहेत त्यासाठी आवश्यक जागेची कमतरता भासल्यास प्रतापगड देवस्थानची जागा वापरण्यास आम्ही तयार आहोत. हे ठिकाण फक्त ऐतिहासिक नाही, तर श्रद्धेचेही केंद्र आहे. त्यामुळे विकास आणि परंपरेचा तोल राखून संवर्धन होईल.”
त्यांनी पुढे सांगितले की, देवस्थान परिसरातील जुन्या वृक्षांची तोड झाल्याने पर्यावरणीय संतुलन अबाधित ठेवण्यासाठी वनविभागामार्फत पुन्हा वनराई संवर्धनाचे काम हाती घेण्यात यावे, अशी सूचना त्यांनी बैठकीत केली.
🔸 “किल्ल्याच्या मूळ रचनेला धक्का न लागता संवर्धन” – जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी माहिती दिली की, जिल्ह्यासाठी एकात्मिक पर्यटन आराखडा ₹381 कोटी 56 लाख इतका मंजूर झाला असून त्यातील प्रतापगडासाठी स्वतंत्रपणे ₹127 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.
त्यांनी सांगितले —
“प्रतापगड हा केवळ किल्ला नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचा आणि युद्धनीतीचा प्रत्यक्ष दाखला आहे. किल्ल्याभोवती सुमारे 14 किल्ले आहेत, ज्यांना पार करून प्रतापगडावर पोहोचणे शत्रूसाठी कठीण होते. या किल्ल्याच्या मूळ ढाच्याला कोणताही धक्का न लावता संवर्धनाची कामे केली जातील.”
🔸 पर्यटन विकासाला नवे बळ
बैठकीत पर्यटन वाढीसाठी पायाभूत सुविधा उभारणे, माहिती केंद्र, शौचालये, पिण्याचे पाणी, प्रकाशयोजना, सुरक्षा व्यवस्थापन आणि ई-बस वाहतूक व्यवस्था कार्यान्वित करण्यावर भर देण्यात आला.
पर्यटकांच्या अनुभवाला नवे परिमाण देणारा “लाईट अँड साऊंड शो” लवकरच सुरू होणार आहे.
🔸 “प्रतापगडाचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवू”
बैठकीत उपस्थित सर्व सदस्यांनी एकमुखाने सांगितले की, प्रतापगडाच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारशाचे जतन हे केवळ शासनाचे नाही, तर प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. प्राधिकरणाच्या माध्यमातून या वारशाचा प्रसार जागतिक स्तरावर केला जाईल.
प्रतापगडाचा जागतिक वारसा स्थळ म्हणून झालेला समावेश हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आहे. या निर्णयामुळे केवळ किल्ल्याचे संवर्धनच नव्हे, तर स्थानिक पर्यटन, रोजगार आणि सांस्कृतिक जागरूकतेलाही मोठा हातभार लागणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा साक्षी असलेल्या प्रतापगडाचा तेजस्वी वारसा आता जगभर झळकणार आहे!
Comments
Post a Comment