महिलांना अश्लील व्हिडिओ कॉल करून त्रास — वाई तालुक्यातील विकृत व्यक्तीवर गुन्हा दाखल
महिलांना अश्लील व्हिडिओ कॉल करून त्रास — वाई तालुक्यातील विकृत व्यक्तीवर गुन्हा दाखल
विलास काळे,
महाबळेश्वर प्रतिनिधी :
वाई तालुक्यातील एका गावात महिलांना मोबाईलवरून अश्लील व्हिडिओ कॉल करून त्रास देणाऱ्या एका व्यक्तीविरुद्ध वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण गावात संताप आणि खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १०.१५ वाजता संबंधित व्यक्तीने गावातील अनेक महिलांना अनुचित स्वरूपाचे व्हिडिओ कॉल केले. कॉल दरम्यान त्याने महिलांसमोर अश्लील कृत्ये केली आणि मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या व्यक्तीने केवळ एक-दोन नव्हे, तर तब्बल १३ हून अधिक महिलांना लक्ष्य केले असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.
सुरुवातीला भीतीपोटी या महिलांनी मौन बाळगले, परंतु अखेर धैर्य दाखवत पीडित महिलांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून वाई पोलिस ठाण्यात दि. ७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता त्या व्यक्तीविरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास हवालदार इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून, त्याचा मोबाईल फोन आणि इतर डिजिटल पुरावे जप्त करून तपास सुरू आहे.
या घटनेमुळे गावात भीती आणि संतापाचे वातावरण पसरले आहे. महिलांनी अशा घटनांना थारा न देण्याचे आणि त्वरित पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment