हजारो पणत्यांच्या प्रकाशात उजळले श्री देव भैरी जोगेश्वरी मंदिर देवळे ग्रामस्थांच्या सहभागाने भव्य नवरात्र दीपोत्सव साजरा
देवळे ग्रामस्थांच्या सहभागाने भव्य नवरात्र दीपोत्सव साजरा
प्रकाश कदम
पोलादपूर प्रतिनिधी :
पोलादपूर तालुक्यातील देवळे गाव हे ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरेसाठी ओळखले जाते. गावाच्या स्थापनेपासूनच येथे असलेल्या श्री देव भैरी जोगेश्वरी देवीच्या प्राचीन मंदिरात नवरात्रोत्सव, होळी आदी पारंपरिक सण मोठ्या श्रद्धा व उत्साहात साजरे केले जातात. यंदाच्या नवरात्रोत्सवाला विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे हजारो पणत्यांनी उजळवलेला दीपोत्सव, ज्यामुळे संपूर्ण मंदिर परिसर भक्तीभावाने उजळून निघाला.
या मंदिरातील नवरात्र परंपरेनुसार देवीसमोर दोन घट मांडले जातात आणि नऊ दिवस वेगवेगळे धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम राबवले जातात. यंदा ग्रामस्थांनी एकत्र येऊन हजारो पणत्या पेटवून मंदिर परिसरात दीपोत्सव साजरा केला. या प्रसंगी गावातील तरुण मंडळी विशेषतः मुंबईसह विविध ठिकाणांहून आपल्या गावी परतली होती. त्यांच्या सहभागामुळे संपूर्ण वातावरण अधिक उत्साहपूर्ण झाले.
पणत्यांच्या प्रकाशाने मंदिर परिसर अधिक मनोहर दिसत होता. हे विहंगम दृश्य आपल्या डोळ्यांत साठवण्यासाठी ग्रामस्थ आणि भक्तांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. आरती, ढोल-ताशांच्या गजरात नृत्य व जल्लोष करत ग्रामस्थांनी देवीच्या चरणी आपली भक्ती व्यक्त केली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही नवरात्रोत्सवानिमित्त गावातील चाकरमानी मंडळी विशेषतः आपल्या गावी येऊन देवीचे दर्शन घेतात आणि नवस पूर्ण करतात. आई भैरी जोगेश्वरीच्या कृपेने नवसाला पावते, अशी श्रद्धा आणि लौकिक या मंदिराला लाभलेला आहे.
ग्रामस्थांच्या सांगण्याप्रमाणे, श्री देव भैरी जोगेश्वरी हे देवळे गावाचे जागृत आणि ग्रामदैवत मानले जाणारे मंदिर असून गावाच्या एकतेचे, श्रद्धेचे आणि परंपरेचे प्रतीक आहे.
Comments
Post a Comment