किल्ले कांगोरीगडावर दसरा सण उत्साहात साजरा; दुर्गसंवर्धन मोहिमेला नवा उत्साह

किल्ले कांगोरीगडावर दसरा सण उत्साहात साजरा; दुर्गसंवर्धन मोहिमेला नवा उत्साह

प्रकाश कदम,

पोलादपूर  प्रतिनिधी – 

"आधी तोरण गडाला, मग माझ्या घराला" या पारंपरिक आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत, महाड-पोलादपूर सीमेवरील ऐतिहासिक किल्ले कांगोरीगड येथे यंदा प्रथमच दसरा सण अत्यंत उत्साह, श्रद्धा आणि दुर्गप्रेमाने साजरा करण्यात आला.

२ ऑक्टोबर रोजी झालेल्या या उत्सवावेळी गडाचा महादरवाजा, गडदेवता मंदिर आणि इतर पुरातन वास्तू पाने-फुलांच्या तोरणांनी सजविण्यात आल्या. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने गडपूजन आणि देवदेवतांचे अभिषेकपूजन करण्यात आले. गडावर पहिल्यांदाच दसरा साजरा होत असल्याने परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

या पूर्वी, पावसाळ्यात वाढलेल्या झाडी-झुडपांची साफसफाई करून पायवाटा मोकळ्या करण्यात आल्या होत्या. यामुळे किल्ल्यावर जाणारे दुर्गप्रेमी आणि पर्यटकांसाठी मार्ग अधिक सुकर झाला आहे. या मोहिमेच्या निमित्ताने आगामी संवर्धन उपक्रमांना देखील शुभारंभ करण्यात आला असून, स्थानिक युवकांनी दुर्गसंवर्धनाची नवी उर्मी दाखवली आहे.

या मोहिमेत राज चांढवेकर, कुशल घाणेकर, सचिन चव्हाण, रामचंद्र साने, ऋषिकेश शिंदे, आकाश नरे, प्रणय कदम, गणेश बुदुडके, ध्रुव सुंभे, शैलेश सुंभे, निखिल सुंभे, मयूर जाधव, ध्रुव पवार, दीपक कालगुडे, तनश्री मालुसरे, प्रतिक्षा सुंभे, प्रेरणा सुंभे, प्रीती सुंभे, पूजा कदम आदी दुर्गसंवर्धकांनी सहभाग नोंदवला.

संयुक्त मोहिमेचे संयोजन प्रविण गोगावले आणि दीक्षा सकपाळ यांनी केले, तर स्थानिक नियोजनाची जबाबदारी राजेश मालुसरे आणि ध्रुव सुंभे यांनी निभावली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक केतन फुलपगारे यांनी केले. त्यांनी कांगोरीगडाचा इतिहास, भूगोल आणि सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेत, आगामी संवर्धन योजनांची रूपरेषा मांडली. मोहिमेच्या यशस्वीतेसाठी मावळा प्रतिष्ठान – पोलादपूर आणि साद सह्याद्री प्रतिष्ठान – महाड या संस्थांचे विशेष सहकार्य लाभले.

दुर्गसंवर्धनासोबतच स्थानिकांनी प्रशासनाकडे पर्यटनविकास आणि पायाभूत सुविधांसाठी महत्त्वपूर्ण मागण्या केल्या. कांगोरीगड माचीपर्यंतचा सुमारे २ किमी डांबरी रस्ता अतिशय जीर्णावस्थेत असून, त्याचे तातडीने डांबरीकरण आणि सुधारणा करण्याची गरज आहे. या रस्त्याचा पुढील टप्पा सडे गावाशी जोडल्यास, महाड आणि पोलादपूर हे तालुके थेट जोडले जातील, ज्यामुळे पर्यटनवाढ, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि औद्योगिक क्षेत्रात पोहोच सुलभता वाढेल, अशी स्थानिक नागरिकांची एकमुखी मागणी होती.

किल्ले कांगोरीगडवरील हा दसरा उत्सव दुर्गसंवर्धन आणि स्थानिक विकासाच्या दृष्टीने ऐतिहासिक पाऊल ठरला असून, या निमित्ताने सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या या गडाचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl