जिल्हा वार्षिक योजनेतील कामांची अंतिम यादी २० ऑक्टोबरपर्यंत तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाईंचे निर्देशस्मार्ट अंगणवाडी, आदर्श शाळांचा विकास आणि प्रलंबित कामांना गती देण्याचे आदेश



जिल्हा वार्षिक योजनेतील कामांची अंतिम यादी २० ऑक्टोबरपर्यंत तयार करा – पालकमंत्री शंभूराज देसाईंचे निर्देश

स्मार्ट अंगणवाडी, आदर्श शाळांचा विकास आणि प्रलंबित कामांना गती देण्याचे आदेश


सातारा प्रतिनिधी :

“जिल्ह्यातील विकास आराखडा केवळ कागदावर न राहता तो जमिनीवर उतरला पाहिजे. जिल्हा वार्षिक योजनेतील कामांची अंमलबजावणी वेगाने व्हावी यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामांची अंतिम यादी २० ऑक्टोबरपर्यंत तयार करावी,” असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात झालेल्या 2025-26 वर्षासाठीच्या जिल्हा वार्षिक योजनेचा (सर्वसाधारण, अनुसूचित जाती व आदिवासी घटक कार्यक्रम तसेच बाह्यक्षेत्र योजना) आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.


लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊनच विकासकामे पूर्ण करा

पालकमंत्री देसाई यांनी स्पष्ट केले की, विकासकामांसंदर्भातील अंतिम प्रस्ताव लोकप्रतिनिधींकडून नियोजित कालावधीत मिळवणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा नियोजन अधिकारी आणि संबंधित विभागांनी सक्रिय पाठपुरावा करावा. “२० ऑक्टोबरनंतर आलेल्या प्रस्तावांना मान्यता दिली जाणार नाही,” असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

सार्वजनिक बांधकाम विभागाबाबत विशेष निर्देश देत त्यांनी सांगितले की, रस्ते, पूल व सार्वजनिक सोयीसुविधांच्या कामांच्या याद्या अंतिम करण्यास विलंब करता येणार नाही. तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता वेळेत मिळवून कामांना गती द्यावी.


स्मार्ट अंगणवाडी उपक्रम; जिल्हा परिषदेचा पुढाकार आवश्यक

जिल्ह्याच्या शैक्षणिक उन्नतीसाठी ‘माझी शाळा – आदर्श शाळा’ उपक्रमासोबत स्मार्ट अंगणवाडी उपक्रम राबवण्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली. त्यांनी स्पष्ट केले –

  • लहान मुलांसाठी बोलक्या भिंती, आकर्षक शिकवणी साहित्य,
  • बसण्याची सोयी (Bench),
  • स्वच्छता गृह आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा
    या सुविधा अंगणवाड्यांमध्ये प्राधान्याने उभारल्या जातील.
    यासाठी जिल्हा परिषदेला आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

निवडणुकांचा कालावधी निकट – निधी परत जाणार नाही याची दक्षता

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे. त्यामुळे सर्व विभागांनी नियोजनबद्ध कामांना तातडीने गती देण्याचे निर्देश देसाई यांनी दिले. “मंजूर निधी परत जाऊ देयचा नाही, हे प्रत्येक विभागाने लक्षात ठेवावे,” असा पुनरुच्चार त्यांनी केला.


करवून दाखवू वृत्ती – कराडमधील नगर परिषद शाळा क्र. ३ च्या विकासाला वेग

याच दौऱ्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथील नगर परिषद शाळा क्र. ३ च्या सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. समग्र शिक्षण अभियानांतर्गत या शाळेसाठी १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून त्यापैकी ६० टक्के केंद्र आणि ४० टक्के वाटा राज्य शासनाचा आहे.

या बैठकीस जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अनिस नायकवडी, मुख्याध्यापक सुहास आलेकरी आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री देसाई म्हणाले, “नगर परिषद शाळा क्र. ३ हे कराड शहराच्या शैक्षणिक प्रगतीचे प्रतिक आहे. हे काम वेळेत आणि उच्च दर्जाने पूर्ण झाले पाहिजे.”


शाळेच्या सोयीसुविधांचा विकास प्राधान्याने

पालकमंत्र्यांनी दिलेले महत्त्वाचे निर्देश :

  • कामात लोकप्रतिनिधींना विश्वासात घेणे बंधनकारक
  • उच्च दर्जाचे साहित्य वापरूनच बांधकाम
  • शाळेसाठी सेक्युरिटी केबिन, कंपाउंड वॉल उभारणी
  • पार्किंग समस्येचे तातडीने निराकरण
  • २,३०० विद्यार्थ्यांचा विचार करून सुविधा उभारणे
  • प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी शालेय शिक्षणमंत्र्यांची भेट घेणार

सातारा जिल्ह्यातील विकासकामांचा वेग वाढविण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेले हे स्पष्ट आणि कडक निर्देश जिल्हा प्रशासनासह स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी दिशा ठरणार आहेत. आगामी काळात जिल्ह्याचा सर्वांगीण विकास आणि शिक्षण क्षेत्रातील प्रगती हेच प्रशासनाचे प्राधान्य असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl