सासापडे येथे अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या; संतप्त ग्रामस्थांचा आरोपीच्या घरावर हल्ला – गावात तणाव, पोलिसांचा फौजफाटा


सासापडे येथे अल्पवयीन मुलीची निर्घृण हत्या; संतप्त ग्रामस्थांचा आरोपीच्या घरावर हल्ला – गावात तणाव, पोलिसांचा फौजफाटा

सातारा प्रतिनिधी |

सातारा तालुक्यातील सासापडे परिसरात घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या निर्घृण हत्येमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. राहत्या घरात 13 वर्षीय शाळकरी मुलीचा खून करण्यात आला असून या प्रकरणी संशयित युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेनंतर आरोपीवर कारवाईची मागणी करत संतप्त जमावाने आरोपीच्या घरावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी बोरगाव पोलीस ठाण्याच्या पथकासह सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेचा फौजफाटा दाखल झाला.

घटना बुधवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. संबंधित मुलगी घरात एकटी असताना तिच्या डोक्यावर लोखंडी जड वस्तूने वार करून तिची हत्या करण्यात आली. प्राथमिक तपासात मुलीच्या शरीरावरील जखमा संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले असून, हा प्रकार "अतिप्रसंगाचा" असल्याची शक्यता पोलिसांनी नाकारलेली नाही. यासंदर्भात पोलिसांनी शेजारील एक संशयित युवक ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे.

मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आला. मात्र संतप्त ग्रामस्थांनी आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत मृतदेह गावात परत नेण्यास काही काळ विरोध केला. यामुळे घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती गंभीर व चिघळणारी पाहून पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात घेतली.

बोरगाव पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखाही सक्रिय झाली आहे. संशयित आरोपीचा हेतू काय होता, मुलीच्या हत्येमागे नेमका कोणता वाद किंवा कारण आहे, तसेच घटना एकट्याने घडवली की अन्य कोणी सहभागी होते याबाबत तपास सुरू आहे. परिसरात तणाव कायम असल्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढवली आहे.

या घटनेमुळे सासापडे परिसरासह संपूर्ण सातारा जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून समाजमाध्यमांतूनही आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे. पुढील तपास बोरगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl