वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; दिवाळीच्या हंगामात प्रतापगड परिसरात बत्ती गुलपर्यटक व स्थानिक व्यावसायिक त्रस्त; तात्काळ उपाययोजना नसल्यास आंदोलनाचा इशारा



वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; दिवाळीच्या हंगामात प्रतापगड परिसरात बत्ती गुल
पर्यटक व स्थानिक व्यावसायिक त्रस्त; तात्काळ उपाययोजना नसल्यास आंदोलनाचा इशारा

जितेंद्र कारंडे
प्रतापगड प्रतिनिधी

प्रतापगड : दिवाळीचा उत्सवी हंगाम, पर्यटनाची चांगली चलती आणि गावोगावी गजबजलेले वातावरण... अशा काळात प्रतापगड परिसरातील हरोशी, जावली, कुंभरशी या भागात वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार समोर आला असून रोज संध्याकाळी वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारात सातत्य राहिले आहे. अचानक बत्ती गुल होत असल्याने स्थानिक व्यावसायिकांसह पर्यटकांच्याही सुविधांवर मोठा परिणाम होत आहे.

पर्यटन व्यवसायावर प्रतापगड परिसरातील अनेक व्यावसायिकांची उपजीविका अवलंबून आहे. विशेषतः दिवाळीच्या लांब सुट्टीत मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होत असतात. मात्र रोज संध्याकाळी लाईट गेल्यानंतर थोड्या वेळासाठी वीजपुरवठा सुरू करून पुन्हा रात्री उशिरा बत्ती गुल करण्याच्या प्रकारामुळे व्यापाऱ्यांचे धंदे ठप्प झाले आहेत.

वीजपुरवठा दुसऱ्या दिवशी सकाळीच जवळपास ९ वाजता सुरू होत असल्याने निवासस्थान, हॉटेल, खानावळ, चहाचे स्टॉल तसेच पर्यटन सुविधा चालवणाऱ्या व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक तोट्याला सामोरे जावे लागत आहे. पर्यटकही अंधारामुळे असुविधेला सामोरे जात असून काही ठिकाणी तर भितीदायक वातावरण निर्माण होत असल्याचे सांगितले जाते.

स्थानिक व्यापाऱ्यांनी रोष व्यक्त करताना सांगितले की,
“वीज वितरण कंपनी वेळेवर बिल भरण्यासाठी तगादा लावते. पण जेव्हा विजेची खरी गरज असते, तेव्हा मात्र पुरवठा देताना कुचराई केली जाते. हा कारभार असाच चालू राहिला तर पर्यटन व्यवसाय उद्ध्वस्त होईल.”

या गैरसोयीबद्दल स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई अथवा उपाययोजना झाली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान,
ही परिस्थिती लवकर नियंत्रित न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिक व्यापारी संघटनांनी दिला आहे.
दिवाळीसारख्या महत्वाच्या कालावधीतही वीजपुरवठ्याचा प्रश्‍न सुटत नसल्याने जनतेत प्रचंड नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.



Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl