“लाडकी बहीण” योजनेच्या पोर्टलवर प्रचंड गर्दी; ग्रामीण भागातील महिला हैराण
“लाडकी बहीण” योजनेच्या पोर्टलवर प्रचंड गर्दी; ग्रामीण भागातील महिला हैराण
✍️ जितेंद्र करंडे,
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर, दि. ३१ : राज्य सरकारच्या “लाडकी बहीण” या अत्यंत महत्त्वाच्या योजनेच्या पोर्टलवर गेल्या काही दिवसांपासून प्रचंड गर्दी होत असून, ग्रामीण भागातील महिलांना नोंदणी व केवायसी प्रक्रियेसाठी अक्षरशः तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. इंटरनेटचा वेग कमी, सर्व्हर डाऊन होण्याच्या समस्या आणि अपुरी सुविधा यामुळे महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सरकारतर्फे सुरू करण्यात आलेल्या या योजनेचा उद्देश महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आहे. मात्र, प्रत्यक्षात नोंदणी प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींमुळे अनेक महिलांना अर्ज भरतानाच हैराण व्हावे लागत आहे. ग्रामीण भागात सीएससी (कॉमन सर्व्हिस सेंटर) आणि महा-इसेवा केंद्रांवर सकाळपासून महिलांची लांबलचक रांग दिसत आहे.
एका केवायसी प्रक्रियेसाठी साधारणतः दीड ते दोन तास लागतात. सर्व्हर वारंवार बंद पडल्याने अनेक महिलांना पुन्हा-पुन्हा प्रयत्न करावे लागत आहेत. काही ठिकाणी पावती निघत नाही, तर काही ठिकाणी ओटीपी न आल्याने महिलांना दिवसाढवळ्या परतावे लागत आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामीण भागातील महिला म्हणतात, “सकाळपासून केंद्रावर आलोय, पण अजून नंबर नाही. इंटरनेट बंद पडलं की सर्व काही थांबतं. घरकाम, शेतकाम सोडून इथे बसावं लागतं,” अशी तक्रार अनेक महिलांनी केली.
सीएससी केंद्रांचे चालकही या परिस्थितीने त्रस्त आहेत. “सर्व्हरवरील भार वाढल्याने वेबसाइट वारंवार बंद पडते. प्रत्येक केवायसीसाठी वेळ वाढतोय, त्यामुळे गर्दी कमी होण्याऐवजी वाढते आहे,” असे एका केंद्र चालकाने सांगितले.
दरम्यान, काही ठिकाणी योजनेची माहिती स्पष्ट न दिल्याने चुकीच्या अर्जांमुळे महिलांना पुन्हा केंद्रावर येण्याचे प्रकारही वाढले आहेत. प्रशासनाने पुरेशा तांत्रिक सुविधा आणि मार्गदर्शन उपलब्ध करून दिले नाही, असा आरोपही स्थानिक पातळीवर केला जात आहे.
“लाडकी बहीण” योजनेमुळे महिलांमध्ये उत्साह असला तरी, पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि मर्यादित केंद्रांमुळे हा उत्साह त्रासात बदलला आहे.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू झालेली “लाडकी बहीण” योजना सध्या तांत्रिक अडचणींच्या भोवऱ्यात अडकली आहे.
शासनाने तत्काळ सर्व्हर स्थिरता व सुविधा वाढवल्यासच ग्रामीण महिलांना खऱ्या अर्थाने या योजनेचा लाभ मिळू शकेल.
Comments
Post a Comment