महाबळेश्वर पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर – राजकारणात नवी समीकरणे, दिग्गजांना आरक्षणाचा धक्का
महाबळेश्वर पंचायत समिती आरक्षण सोडत जाहीर – राजकारणात नवी समीकरणे, दिग्गजांना आरक्षणाचा धक्का
जितेंद्र कारंडे/विलास काळे
प्रतापगड प्रतिनिधी/महाबळेश्वर प्रतिनिधी–
महाबळेश्वर तालुक्यातील पंचायत समितीच्या चार गणांसह जिल्हा परिषदेच्या दोन गटांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवारी येथील खादी ग्रामोद्योग सभागृहात पार पडला. उपजिल्हाधिकारी अभिषेक देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत तहसीलदार सचिन मस्के, गटविकास अधिकारी विजयकुमार विभुते आणि नायब तहसीलदार दीपक सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. आरक्षण जाहीर होताच तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल दिसू लागले असून इच्छुकांमध्ये “काही खुशी, काही गम” अशी स्थिती निर्माण झाली आहे.
गेल्या पंचवार्षिक कार्यकाळात पंचायत समिती महाबळेश्वरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्य तर शिवसेनेचा एक सदस्य निवडून आला होता. त्यामुळे सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात होती. मात्र, आता तालुक्याचे राजकारण पूर्णपणे बदलले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाची शिवसेना (शिंदे गट) सोबत युती झाली असून भाजपही सक्रिय झाली आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि काँग्रेससह महाविकास आघाडीही मैदानात उतरणार असल्याने निवडणूक चुरशीची होणार हे निश्चित झाले आहे.
आरक्षण सोडतीनुसार तालुक्यातील चार गणांचे आरक्षण पुढीलप्रमाणे जाहीर झाले आहे:
कुंभरोशी गण – सर्वसाधारण
तळदेव गण – सर्वसाधारण
मेटगुताड गण – ओबीसी महिला राखीव
भिलार गण – सर्वसाधारण महिला राखीव
---
🔷 राजकीय चौकट 🔷
भिलार गटाला आरक्षणाचा फटका – दिग्गज इच्छुकांना प्रतीक्षा
भिलार हा तालुक्यातील गत आमदार स्व. बाळासाहेब भिलारे यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. त्यांनी या गटाचे अनेक वेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या पश्चात या गटाचा राजकीय वारसा नितीन भिलारे आणि राजेंद्र राजपुरे यांच्या हातात जाईल अशी चर्चा होती. दोघेही या गटातून आगामी निवडणुकीसाठी इच्छुक होते. मात्र यंदा भिलार गट सर्वसाधारण महिला राखीव झाल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे या गटातून पुन्हा दावेदारी करण्यासाठी आता पाच वर्षांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
---
सोडतीदरम्यान बाबुराव सपकाळ, सुरेश सावंत, अनिल भिलारे, प्रदीप कात्रट ,संजय शेलार, गणेश उतेकर, सुभाष कारंडे, सुनील सपकाळ, हेमंत शिंदे, नंदकुमार बावळेकर, संभाजी भिलारे, संजय उतेकर, जगन्नाथ भिलारे, गणेश जाधव, रवी ढेबे, पंढरीनाथ लांगी, राजेंद्र पुजारी, मुन्ना वारणकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान संजय उतेकर यांनी सभापती पदाचे आरक्षण ओबीसी सर्वसाधारण असताना गणांमध्ये ओबीसी महिला आरक्षण कसे दिले, असा प्रश्न उपस्थित केला. यावर तहसीलदार सचिन मस्के यांनी स्पष्ट केले की, आरक्षण प्रक्रिया नियम आणि रोटेशन पद्धतीनुसारच पार पडली असून ओबीसी महिलांनाही सभापती होण्याचा अधिकार आहे.
आरक्षण सोडतीमुळे तालुक्यातील राजकारणाला नवे वळण मिळाले असून राष्ट्रवादी (अजित पवार गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्या महाभिडतीची रंगतदार निवडणूक होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत.
Comments
Post a Comment