आंबेनळी घाटासाठी पर्यायी रस्त्याची तातडीची गरज – प्रशासनाचे दुर्लक्ष, जनतेत नाराजी

आंबेनळी घाटासाठी पर्यायी रस्त्याची तातडीची गरज – प्रशासनाचे दुर्लक्ष, जनतेत नाराजी

प्रकाश कदम ,
पोलादपूर प्रतिनिधी – 

मुंबई–गोवा महामार्गाला जोडणारा पोलादपूर–महाबळेश्वर रस्ता पावसाळ्यात नेहमीच धोकादायक ठरतो. विशेषतः आंबेनळी घाटात दरड कोसळण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे हा घाट वारंवार बंद ठेवावा लागतो, परिणामी पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्हा आणि रायगड जिल्ह्याचे संपर्क तुटतात.

यंदाही रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांनी आदेश काढून १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान अवजड वाहतुकीसाठी घाट बंद ठेवला. मात्र, अनेक वर्षांपासून पर्यायी रस्त्याची मागणी होत असूनही प्रशासनाकडून कोणतेही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही, अशी भावना स्थानिकांमध्ये आहे.

जुनी मागणी, अपूर्ण काम
माजी सरपंच प्रकाश कदम (देवळे) यांनी अनेक वर्षांपूर्वीच पितळवाडी–केवनाळे–आंबेमाची–चिरेखिंड मार्ग आंबेनळी घाटाला पर्याय म्हणून द्यावा अशी मागणी तत्कालीन आमदार व आत्ताचे मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडे केली होती. यानुसार मंत्री गोगावले यांनी या मार्गाला मंजुरी दिली व काम सुरू झाले, मात्र निधीअभावी आजही तो कच्चा रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे. योग्य निधी उपलब्ध झाल्यास हा रस्ता घाटासाठी विश्वासार्ह पर्याय ठरू शकतो, असे स्थानिकांचा मत आहे.

पर्यायी मार्गांच्या प्रस्तावना
आंबेनळी घाटावरील समस्या सोडवण्यासाठी अनेक पर्यायी मार्ग सुचवले गेले आहेत:

1. पोलादपूर–कुडपण–कोंडोशी–कुमठे मार्ग : पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असून रायगड–सातारा जोडणारा महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो. या मार्गामुळे "मिनी महाबळेश्वर" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कुडपण गावाचा पर्यटन विकास होईल.


2. आडकिनेश्वर–राम वरदायिनी मंदिर–पार महाबळेश्वर मार्ग : हा शिवकालीन ऐतिहासिक मार्ग असून आजही अस्तित्वात आहे. याची दुरुस्ती करून वापरात आणल्यास पश्चिम घाटाला थेट दुवा मिळू शकतो. शिवमुद्रा प्रतिष्ठान व पार येथील ग्रामस्थांनी यासाठी पत्रव्यवहार केला आहे.


3. पोलादपूर–देवळे–दाभिल–वाडा–कुंभरोशी मार्ग : या मार्गावर घाट कमी असून दरडीचा धोका तुलनेने कमी आहे. स्थानिकांच्या मते हा मार्गही घाटासाठी पर्याय म्हणून उपयुक्त ठरू शकतो.



परिणाम आणि गरज
आंबेनळी घाट बंद झाल्यास सातारा, वाई परिसरातून रायगडातील पोलादपूर, महाड, मंडणगड, दापोली, माणगाव या भागात होणारा भाजीपाला व दूध पुरवठा ठप्प होतो. तसेच वाडा परिसरातील ४४ गावांतील विद्यार्थी शिक्षणासाठी महाड व पोलादपूरला जातात, नोकरदार वर्ग रोजच्या प्रवासासाठी घाटावर अवलंबून आहे, तर पर्यटकांचा खोळंबा होऊन पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसतो.

स्थानिकांची मागणी
स्थानिक जनता व सामाजिक संघटनांनी वारंवार मागणी केली असून सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित पर्यायी रस्त्यांचा आराखडा तयार करून निधी उपलब्ध करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.

"मा. सार्वजनिक बांधकाम मंत्री महोदयांकडे आणि मा. मंत्री भरतशेठ गोगावले यांच्याकडे पाठपुरावा करून या पर्यायी मार्गांसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आम्ही केली असून आमच्या मागणीला नक्कीच प्रतिसाद मिळेल. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूरकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टळेल," – असे सांगितले श्री. चंद्रकांत कळंबे, माजी उपाध्यक्ष, रायगड जिल्हा परिषद.


---

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl