पोलादपूर पंचायत समितीच्या गणांची आरक्षण जाहीर आरक्षण जाहीर होताच राजकीय मोर्चेबांधणीला वेग – तालुक्यात नव्या समीकरणांना सुरुवात
पोलादपूर पंचायत समितीच्या गणांची आरक्षण जाहीर
आरक्षण जाहीर होताच राजकीय मोर्चेबांधणीला वेग – तालुक्यात नव्या समीकरणांना सुरुवात
प्रकाश कदम,
पोलादपूर प्रतिनिधी –
पोलादपूर तालुका पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीला वेग आला असून अखेर पंचायत समितीच्या चार गणांची आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे. सोमवारी कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात पार पडलेल्या या सोडतीला रविंद्र राठोड (निरीक्षक तथा उपजिल्हाधिकारी – रोहयो) व तहसीलदार कपिल घोरपडे यांच्या प्रमुख उपस्थिती लाभली. नियमाप्रमाणे चिठ्ठी पद्धतीने झालेल्या या सोडतीत खालीलप्रमाणे गणांचे आरक्षण जाहीर झाले:
| पं.स. गण | आरक्षण प्रवर्ग |
|---|---|
| 115 माटवण | नामनिर्देशित प्रवर्ग – महिला |
| 117 लोहारे | सर्वसाधारण – महिला |
| कापडे | सर्वसाधारण |
| कोतवाल | सर्वसाधारण |
या आरक्षण जाहीर घोषणेनंतर तालुक्यातील राजकारणात चैतन्य निर्माण झाले असून इच्छुकांच्या गाठीभेटी, चर्चा, रणनीती व मोर्चेबांधणीला वेग आला आहे. मागील काही वर्षांपासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना आता गती मिळण्याची चिन्हे दिसत असल्याने राजकीय वातावरण तापू लागले आहे.
मागील निवडणूक पार्श्वभूमी
मागील पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शेतकरी-कामगार पक्ष (शेकाप) या तिन्ही पक्षांची निवडणुका पूर्वी आघाडी होती. या आघाडीने तीन जागांवर बाजी मारली होती. त्यावेळचे निकाल पुढीलप्रमाणे:
- गोवेले 115 गण – सर्वसाधारण महिला प्रवर्गातून नंदा दिनकर चांदे (शेकाप)
- देवळे 116 गण – सर्वसाधारण प्रवर्गातून शैलेश सलागरे (काँग्रेस)
- लोहारे 117 गण – नागरिकांचा मागास प्रवर्गातून यशवंत कासार (शिवसेना)
- कोंढवी 118 गण – सर्वसाधारण महिला प्रवर्गातून दिपिका दरेकर (काँग्रेस)
त्यावेळी सभापतीपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर अनुसूचित जाती महिला असे जाहीर झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. उमेदवार नसल्यामुळे आरक्षण बदलावे लागले आणि सर्वसाधारण महिला असे आरक्षण जाहीर करून काँग्रेसच्या दिपिका दरेकर यांची सभापतीपदी निवड करण्यात आली. तर प्रभारी सभापती शैलेश सलागरे यांना उपसभापतीपद मिळाले होते.
नव्या राजकीय समीकरणांचे संकेत
यंदा आरक्षण जाहीर होताच तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. शिंदे गट – शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – शेकाप – भाजप असा त्रिकोणी संघर्ष तालुक्यात निर्माण होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपद व पंचायत समिती सभापतीपदाची आरक्षणे आधीच जाहीर झाल्याने मागीलवेळीसारखा आरक्षणाचा गोंधळ पुन्हा होणार नसल्याचे प्रशासनिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. आज पोलादपूर येथे पंचायत समिती गणांची, तर अलिबाग येथे गटांची सोडत पार पडल्यानंतर तालुक्यातील राजकारणात उभ्या फळींच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
पुढील चित्रण
- इच्छुक उमेदवारांकडून जनसंपर्काची तयारी सुरू
- प्रमुख पक्षांत तिकीटांसाठी अंतर्गत चाचपणी
- स्थानिक पातळीवर गट-तटविरहित नव्या नेतृत्वालाही संधी
- ग्रामीण मुद्द्यांवर आधारित निवडणुकीची शक्यता
- विकास कामे विरुद्ध राजकीय गटबाजी – प्रचाराचे दोन केंद्रबिंदू
पोलादपूर तालुक्यातील पंचायत राजकारण नव्या टप्प्यात प्रवेश करत असून येणारे काही दिवस तालुक्यातील राजकीय चित्र अधिक स्पष्ट करणारे ठरणार आहेत.
Comments
Post a Comment