गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे – ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राज्यात उत्साहात सुरू
गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारे – ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राज्यात उत्साहात सुरू
विजय जाधव,
सातारा प्रतिनिधी –
ग्रामीण भागात विकासाच्या नवनव्या संधी निर्माण करून गावांना स्वावलंबी, स्वच्छ, सुसंस्कृत आणि सक्षम बनवण्याच्या उद्देशाने सुरु झालेले ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ राज्यभर उत्साहात राबवले जात आहे. ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या या अभियानाला ग्रामीण भागातून जोरदार प्रतिसाद मिळत असून, स्पर्धात्मक विकासाची चळवळ गावोगावी वेगाने वाढताना दिसत आहे.
या अभियानाचे प्रवर्तक आणि यशदा पुणेचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी "माझं गाव माझी बातमी" या माध्यमाशी संवाद साधताना या अभियानातील वैशिष्ट्ये, उद्दिष्टे आणि ग्रामपंचायतींसाठी ही मिळालेली सुवर्णसंधी याबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली.
---
लोकसहभागातून विकास साधणारे अभियान
डॉ. कलशेट्टी म्हणाले,
“या अभियानाचा प्राण म्हणजे लोकसहभाग. ग्रामपंचायतींच्या नियमित कामकाजात ग्रामस्थांचा सहभाग वाढवला तर गाव मजबूत होईलच, त्याचबरोबर स्वावलंबी विकासाची वाट खुली होईल. गावाचा विकास हा ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधी आणि गावकऱ्यांच्या संयुक्त सहभागातूनच शक्य आहे.”
या अभियानात एकूण 100 गुणांची विकास स्पर्धा ठेवण्यात आली आहे. 9 थीम आणि 8 महत्त्वाचे घटक यावर आधारित गुणांकन होणार आहे. यामध्ये स्वच्छता, आरोग्य, पाणी व्यवस्थापन, शिक्षण, डिजिटल ग्रामव्यवस्था, महिला सक्षमीकरण, स्थानिक रोजगार, पर्यावरण संवर्धन, सामाजिक बांधिलकी अशा विविध घटकांचा समावेश आहे.
---
योजनांचे कन्वर्जन्स – गावांचा विकास वेगात
डॉ. कलशेट्टी म्हणाले की, “या अभियानाची खासीयत म्हणजे योजनांचे कन्वर्जन्स. म्हणजेच विविध शासन योजनांचा एकत्रित व प्रभावी वापर करून गावांचा विकास वेगाने साधणे.”
अभियानातील प्रमुख उपक्रम:
✅ ग्रामपंचायत सेवा पारदर्शक व कार्यक्षम बनवणे
✅ ‘मी वसुंधरा’ अंतर्गत पर्यावरणपूरक उपक्रम
✅ संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान बळकट करणे
✅ पंतप्रधान आवास योजना गतीमान करणे
✅ महिला बचत गटांना आर्थिक शक्ती देणे
✅ ग्रामीण शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत कार्यालयांचे स्मार्टिकरण
✅ स्मशानभूमी व सार्वजनिक ठिकाणांचे सुशोभीकरण
✅ ग्राम आरोग्य, पाणीपुरवठा व रोजगार निर्मितीला गती
“या अभियानाची ताकद म्हणजे गावांचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता. हे फक्त बांधकामांपुरते विकास नाही, तर शाश्वत बदलाची चळवळ आहे,” असे ते म्हणाले.
---
बक्षिसांची मोठी संधी – 5 कोटींचे पारितोषिक
अभियानात स्पर्धा तत्त्वावर बक्षिसांची आकर्षक रचना आहे. राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचे बक्षीस 5 कोटी रुपये आहे. विभाग, जिल्हा आणि तालुका स्तरावरही बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. मात्र बक्षिसे हे अभियानाचे एकमेव लक्ष्य नसून गावाचा सन्मान, स्वावलंबन आणि विकास ही खरी जमेची बाजू असल्याचे डॉ. कलशेट्टी यांनी नमूद केले.
---
"ही सुवर्णसंधी दवडू नका" – ग्रामस्थांना आवाहन
गावकऱ्यांना आवाहन करताना ते म्हणाले,
“हे अभियान म्हणजे गावांसाठी विकासाचे दार उघडणारी सुवर्णसंधी आहे. प्रत्येक गावाने जोमाने सहभाग घ्यावा. ‘माझं गाव – समृद्ध गाव’ ही भावना प्रत्यक्षात आणण्यासाठी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी एकच संघ म्हणून काम केले पाहिजे. बक्षिसे मिळाली तर आनंदाची गोष्ट, पण खरी जिंक गावांचीच होईल.”
---
नवरत्न गावांची घडण – शाश्वत विकासाचा ध्यास
या अभियानाच्या माध्यमातून ‘नवरत्न गाव’ ही संकल्पना राज्यात रुजवली जात आहे. शाश्वत विकास ध्येयांच्या (SDG-17) अनुषंगाने हे अभियान राबवले जात असून स्वच्छ, निरोगी, सुरक्षित, हिरवेगार आणि आधुनिक गाव घडवण्याचा संकल्प यातून पुढे येतोय.
---
ग्रामविकासाला नवी दिशा देणारे ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान’ हे केवळ शासनाचे अभियान नसून गावांच्या परिवर्तनाची जनचळवळ बनू लागली आहे. या अभियानातून गावोगावी विकासाचा नवा इतिहास घडण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.
---
— रिपोर्ट : माझं गाव माझी बातमी ✅
Comments
Post a Comment