महाबळेश्वरचे सुपुत्र डॉ. नंदकुमार शिंदे यांना दिल्ली येथे “विद्या वाचस्पती” सारस्वत पदवीने सन्मान
महाबळेश्वरचे सुपुत्र डॉ. नंदकुमार शिंदे यांना दिल्ली येथे “विद्या वाचस्पती” सारस्वत पदवीने सन्मान
“डॉक्टरेट इन एज्युकेशन अँड सोशल वर्क” : शिक्षण व समाजसेवा क्षेत्रातील कार्याबद्दल प्रतिष्ठित गौरव
✍️ प्रेषित गांधी/विलास काळे ,
महाबळेश्वर प्रतिनिधी :
महाबळेश्वर, दि. ३१ ऑक्टोबर – माचुतर (ता. महाबळेश्वर) या छोट्याशा गावातून शिक्षण, समाजसेवा आणि वैद्यकीय संशोधनाच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर आपली ओळख निर्माण करणारे आदर्श शिक्षक डॉ. नंदकुमार शिंदे यांना दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात “विद्या वाचस्पती (Doctorate in Education and Social Work)” या प्रतिष्ठित सारस्वत सन्मानाने गौरविण्यात आले. हा सन्मान पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ, वृंदावन धाम (मथुरा) यांच्या वतीने शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रदान करण्यात आला.
हा सन्मान सोहळा नवी दिल्ली येथील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये २६ ऑक्टोबर रोजी मोठ्या थाटामाटात पार पडला. या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठाचे कुलपती डॉ. इंदूभूषण मिश्रा होते. प्रमुख अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. अरविंद कुमार (माजी कुलगुरू, राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विद्यापीठ, झाँसी), शिक्षणतज्ज्ञ व साहित्यकार डॉ. ऋतु दुबे तिवारी, राष्ट्रीय पर्यावरणतज्ज्ञ व जागतिक विक्रमधारक डॉ. विश्वनाथ पाणिग्रही आदी मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते डॉ. शिंदे यांना “विद्या वाचस्पती” ही डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ. नंदकुमार शिंदे यांनी मागील ३७ वर्षांपासून शिक्षक म्हणून अविरत सेवा दिली असून, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. शिक्षक म्हणून त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर जीवनमूल्ये आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव दिली. शिक्षणाबरोबरच त्यांनी वैद्यकीय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
त्यांनी “मानवी शरीरातील विद्युत चुंबकीय शक्ती” या विषयावर सखोल आंतरराष्ट्रीय संशोधन केले असून, हे प्रबंध “असोसिएट ऑफ रॉयल सोसायटी ऑफ हेल्थ, लंडन” येथे सादर करण्यात आले. त्यांच्या या संशोधनासह शिक्षण आणि समाजसेवा क्षेत्रातील कार्याचा सखोल अभ्यास पाहून पं. दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठाच्या प्रबंध समितीने त्यांना “विद्या वाचस्पती (Doctorate in Education and Social Work)” ही पदवी बहाल करण्याचा निर्णय घेतला.
या गौरवसोहळ्याला शिंदे कुटुंबीयांची उपस्थिती विशेष ठरली. सन्मानानंतर महाबळेश्वर परिसरात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, डॉ. शिंदे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
महाबळेश्वरचे माजी नगराध्यक्ष किसनशेठ शिंदे, माजी नगरसेवक सुनील शिंदे, माजी सभापती संजुबाबा गायकवाड, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, बांधकाम व्यावसायिक डी.एल. शिंदे, नाना शिंदे, प्रवीण भिलारे आदी मान्यवरांनी डॉ. शिंदे यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
डॉ. शिंदे यांचा हा सन्मान केवळ त्यांचा व्यक्तिगत अभिमान नसून, तो संपूर्ण महाबळेश्वर तालुक्याचा आणि सातारा जिल्ह्याचा अभिमान असल्याचे मत स्थानिक शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक व्यक्त करत आहेत.
Congratulations.
ReplyDeleteधन्यवाद!
Delete