महाबळेश्वर तालुक्यातील निवडणूक वातावरण : पक्षा-अंतर्गत कुरघोडीला उधाण, राजकीय तापमान वाढले
महाबळेश्वर तालुक्यातील निवडणूक वातावरण : पक्षा-अंतर्गत कुरघोडीला उधाण, राजकीय तापमान वाढले
✍️ जितेंद्र कारंडे,
प्रतापगड प्रतिनिधी :
महाबळेश्वर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची धामधूम सुरू होताच राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. प्रमुख पक्षांतर्गत गटबाजी व कुरघोडीला उधाण आल्याने तालुक्यातील राजकारण रंगतदार झाले आहे. उमेदवारांची निवड, नेतृत्वावरून सुरू असलेले संघर्ष, संघटनातील असंतोष आणि कार्यकर्त्यांमधील संभ्रम यामुळे आगामी निवडणूक अधिकच चुरशीची ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.
भाजपमध्ये तिन गटबाजी उघड
सत्ताधारी भारतीय जनता पक्षात तालुक्यात तीन स्वतंत्र गट स्पष्ट झाले आहेत. प्रत्येक गट आपला प्रभाव वाढवण्यासाठी स्पर्धेत असून, उमेदवारीवरून कुरघोडी रंगत आहे. कार्यपद्धतीतील मतभेदांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे भाजपची एकजूट टिकून राहील का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यात भाजपचा आतला गोट एकवटला नाही, तर त्याचा थेट परिणाम निकालावर होऊ शकतो.
शिवसेना (शिंदे गट) मध्ये तालुकाप्रमुख पदावरून संघर्ष
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटात तालुकाप्रमुख पदावरून मोठा संघर्ष उफाळला आहे. जुने तालुकाप्रमुख आपला दावा सोडायला तयार नसताना, नवीन तालुकाप्रमुखांकडे अधिकृत नियुक्तीपत्र असल्याने परिस्थिती गुंतागुंतीची झाली आहे. परिणामी, एकाच तालुक्यात दोन तालुकाप्रमुख असल्याचे चित्र निर्माण झाले असून कार्यकर्ते संभ्रमात आहेत. याचा थेट परिणाम संघटनात्मक शिस्तीवर होत असून, गटात फूट अधिकच वाढण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये अंतर्गत स्पर्धा
अजित पवार गटातही गटबाजी उफाळली आहे. स्वर्गीय बाळासाहेब भिलारे यांच्या कार्याचा प्रभाव तालुक्यात अद्याप जाणवतो आहे. त्यांच्या नावाचा आधार घेत दोन्ही स्थानिक नेते कार्यरत आहेत. वरवर एकजूट दाखवली जात असली तरी प्रत्यक्षात दोन्ही गटांत स्पर्धा तीव्र झाली आहे. उमेदवारीवरून तसेच संघटनात्मक वर्चस्वावरून सुरू असलेली ही चढाओढ कोणता गट वरचढ ठरवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना (उद्धव ठाकरे गट) मर्यादित सक्रियता
उद्धव ठाकरे गट तालुक्यात फारशी हालचाल करताना दिसत नाही. ग्रामीण भागात पक्षाची पकड हळूहळू कमी झाल्याचे जाणवत आहे. काही ठिकाणी निष्ठावान कार्यकर्ते सक्रिय असले तरी संघटनात्मक हालचाली मर्यादित आहेत. या गटाला निवडणुकीत प्रभावी उपस्थिती दर्शवण्यासाठी संघटन बळकट करणे हे मोठे आव्हान ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शांतपणे सक्रिय
शरद पवार गट मात्र गाजावाजा न करता नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहे. गावोगावी संपर्क साधणे, कार्यकर्त्यांशी नियमित संवाद ठेवणे आणि संघटन बळकट करणे या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे जाहीर चढाओढ नसली तरी या गटाची शांत रणनीती निवडणुकीत अनपेक्षित परिणाम घडवू शकते, अशी चर्चा रंगत आहे.
काँग्रेसची अस्तित्वाची लढाई
काँग्रेस पक्ष आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करत आहे. कार्यकर्ते सक्रिय असले तरी प्रभावी नेतृत्वाच्या अभावामुळे पक्षाचे संघटन सध्या दुर्बळ दिसत आहे. उमेदवारी व प्रचार या दोन्ही आघाड्यांवर काँग्रेसला अजून मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.
राजकीय तापमान वाढले
महाबळेश्वर तालुक्यातील राजकारण सध्या गटबाजी, मतभेद आणि कुरघोडीमुळे अधिकच रंगतदार झाले आहे. अजून आरक्षण जाहीर झालेले नसतानाच वाद उफाळल्याने निवडणूक समीकरणे अनिश्चित झाली आहेत.
नागरिकांमध्ये संभ्रम
गावांचा विकास आणि स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था महत्त्वाची असतात. मात्र, पक्षांतील अंतर्गत गटबाजी आणि स्वार्थी राजकारण पाहून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. खरंच विकासाचा विचार होईल का, की केवळ सत्तेसाठी भांडणं होतील, याबाबत गावोगावी चर्चा रंगू लागली आहे.
Comments
Post a Comment